आरोग्य मंत्री सावंत यांच्या विधानाचा घेतला समाचार
नारायणगाव येथे शिवसेना कार्यकर्ते, पदाधिकारी मेळावा
नारायणगाव – आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी मराठा समाजाबाबत केलेल्या अवमानकारक विधानाचा मी निषेध केला आहे. मराठा समाज व इतर कोणत्याही समाजाचा अवमान करणे चुकीचे आहे. मराठा समाज पेटून उठला ना तर तुमच्याकडे खाजवायला एक जागा सुद्धा शिल्लक राहणार नाही, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिला.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे मंगळवारी (दि. 27) जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. नारायणगाव येथील शासकीय विश्रामगृहात शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार बाळासाहेब दांगट, दिलीप बामणे, सरपंच योगेश पाटे, तालुका प्रमुख माऊली खंडागळे, माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब पाटे, राम गावडे आदी मान्यवर उपस्थितीत होते.
आंबादास दानवे म्हणाले की, नुकसानभरपाई मिळाली असती तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या टळल्या असत्या. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रूपयांचे अनुदान अद्याप मिळालेले नाही. 40 आमदारांनी गद्दारी केली, काही फरक पडत नाही. सर्वसामान्य शिवसैनिक जागेवरच आहे. संघटनात्मक बांधणी करा. राज्यात क्रांती होईल, असे त्यांनी नमूद केले.
आळेफाटा येथे जंगी स्वागत
बेल्हे – महाराष्ट्र राज्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी आळेफाटा येथे धावती भेट दिली. या ठिकाणी आल्यानंतर त्यांचे जुन्नर तालुका शिवसेनेच्या वतीने स्वागत करण्यात आले. याप्रसंगी शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. तसेच उपस्थित शिवसैनिकांच्या वतीने दानवे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.