शिक्रापूर – शिक्रापूर (ता. शिरूर) पोलीस ठाणे हद्दीमध्ये वेगवेगळे गंभीर गुन्हे करून दहशत माजविणाऱ्या आठ युवकांच्या टोळीला तीन महिन्यांसाठी पुणे जिल्ह्यातील काही भागातून तडीपार करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी दिली.
अनिकेत रामदास गायकवाड (वय 25), प्रतिक किरण केवटे (वय 19 दोघे रा. शिक्रापूर, ता. शिरूर), अभिषेक अंकुश नाईकनवरे (वय 23), पवन श्रीरंग जगताप (वय 25), रुपेश राजू वैराग (वय 23), सतीश भगवान जाधव (वय 22), निखील सावकार शेळके (वय 23, पाचही रा. पिंपळे जगताप ता. शिरूर), भानुदास ऊर्फ आण्णा सुरेश जाधव (वय 20, रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर) असे तडीपार केलेल्यांची नावे आहेत. या आठही जणांना शिरूर, दौंड, हवेली या तीन तालुक्यांसह पुणे व पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीतून तीन महिन्यांकरता तडीपार करण्यात आले आहे. यापैकी कोणीही वरील पोलीस ठाणे हद्दीमध्ये कोठे आढळून आल्यास शिक्रापूर पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन सदाशिव शेलार यांनी केले आहे.