एका ‘तिकिटा’साठी दोघांचा खेळ

इंदापुरातील उमेदवारीसाठी पाटील आणि भरणे यांच्यात चुरस

पुणे – कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या त्यातच आघाडीबाबतचा निर्णय होण्यापुर्वीच दोन्ही पक्षांतील दावेदारांनी मतदार संघात भेटीगाठी घेण्यास सुरूवात केल्याने आघाडीच्या मुद्याचा विसर पक्षश्रेष्ठींना पडला की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. ज्या-त्या जागा त्या-त्या पक्षाकडेच राहतील, असेही आघाडीचे सुत्र सांगितले जात असल्याने इच्छुक उमेदवारातही संभ्रम निर्माण झाला आहे. यातूनच इंदापुरातील राजकीय हवा तापली आहे.

संभाव्य उमेदवार समजले जाणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी मतदारसंघात विकासकामांच्या भुमीपुजनांचा धडाका लावलेला असताना कॉंग्रेसचे संभाव्य उमेदवार माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही शक्तीप्रदर्शन मेळाव्याचा मुहूर्त काढला आहे. एका “तिकीटा’साठी दोघांचा खेळ सुरू असल्याने यातून राजकीय नाट्य रंगात आले आहे.

लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात कॉंग्रेसचा “हात’ मिळाल्यानेच राष्ट्रवादी कॉंग्रेसला प्रतिष्ठा राखता आली. बारामती मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या सुप्रिया सुळे यांना इंदापुरातून 70 हजारांपेक्षा अधिक मताधिक्‍य मिळाल्याने विधानसभेकरीता कॉंग्रेसला मदत करण्याबाबत तसेच विधानसभा निवडणूक आघाडी करून लढविण्याचा ठाम निर्धार करण्यात आला. यामुळे जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदार संघातील राजकीय चित्र स्पष्ट झाले होते. तर, इंदापुरातून माजीमंत्री पाटील यांच्या विजयाचा मार्गही सोपा झाल्याचे मानले जात होते. परंतु, आघाडी होण्याची दाट शक्‍यता असताना विद्यमान आमदारांच्या जागा त्या-त्या पक्षाकडेच ठेवाव्यात हे आघाडीचे सुत्र राहणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केल्याने दोन्ही पक्षांकडून आघाडीबाबत सावध भुमिका घेतली जात आहे. यामुळेच राष्ट्रवादी कॉंग्रेसने इच्छुकांचे अर्ज मागवून मुलाखती घेतल्या तर कॉंग्रेसनेही असाच उपक्रम राबविला. यातून आघाडी होणार की नाही, याबाबत आता पदाधिकारी, कार्यकर्त्यांतही संभ्रम निर्माण झाला आहे, त्यातच पक्षाच्या नेत्यांकडूनही वेगवेगळी विधाने केली जात असल्याने इच्छुक उमेदवारांतही चलबिचल आहे. याचाच परिणाम आता जिल्ह्यातील मतदारसंघात जाणवू लागला आहे.

इंदापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार म्हणून आमदार दत्तात्रय भरणे यांचे नाव आघाडीवर असल्याने त्यांनी इंदापुरात विकासकामांच्या माध्यमातून जोर लावला आहे. तर, याला प्रत्यत्तर म्हणून कॉंग्रेसचे संभाव्य उमेदवार माजीमंत्री हर्षवर्धन पाटील हे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. प्रत्येक रविवारी मतदार संघातील एका गावात त्यांची संवादयात्रा सुरू आहे. विधानसभा निवडणूक लढविण्याची जय्यत तयारी भरणे आणि पाटील दोघांनी केली आहे.

या दोन दिग्गज नेत्यांत तालुका काबीज करण्याकरीता कमालीची चुरस आताच दिसू लागली आहे. त्यातही सभापती प्रविण माने यांच्याही नावाची राष्ट्रवादीकडून चाचपणी सुरू आहे. मराठा समाजाचा विचार करून माने यांची साथ आमदार भरणे यांच्याकरीता महत्त्वाची मानली जात आहे. तर, याच मुद्यावर हर्षवर्धन पाटील यांनीही अन्य समाजातील कार्यकर्त्यांशी जवळीक साधली आहे. यातून आघाडीचा निर्णय होण्यापूर्वीच इंदापुरातील जागेबाबतचा पेच निर्माण झाला आहे.

दोन ठिकाणी दिसणारे कार्यकर्ते…
विधानसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढायचीच, असा पक्का निर्णय आमदार दत्तात्रय भरणे आणि माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी घेतला आहे. पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा उप्रकम हाती घेतला आहे. त्या-त्या ठिकाणची परिस्थिती कार्यकर्त्यांकडून भरणे यांच्याकडूनही माहिती करून घेतली जात आहे. भरणे यांनी कॉंग्रेसमधील स्नेही जणांशीही संवाद वाढविला आहे. यातून उमेदवारीसाठी दोन दिग्गजांचे प्रयत्न सुरू असताना दोन ठिकाणी दिसणाऱ्या कार्यर्त्यांची संख्या अधिक असल्याने भरणे आणि पाटील यांच्याकरीता असे कार्यकर्ते डोकेदुखी ठरणार आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.