पिंपरी (प्रतिनिधी) – शहरामध्ये करोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर करावाई करून त्यांच्याकडून पाचशे रुपये दंड वसूल केला जात होता. मात्र दंडाची रक्कम जास्त असल्याने स्थायी समितीच्या बैठकीत ही रक्कम कमी करून दोनशे रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे मास्क न वापरणाऱ्या नागरिकांना दोनशे रुपये दंड आकारला जाणार आहे.
शहरात गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधित रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे 8 एप्रिल रोजी काढलेल्या आदेशामध्ये पुणे जिल्ह्यातील नागरिकांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी, रुग्णालये, बाजारपठे, शासकीय कार्यालयांसह इतर सर्व परिसरात वावरताना मास्क परिधान न करणाऱ्या नागरिकांविरोधात कारवाई करून 500 रुपये दंड वसूल केला जात होता. मात्र दंडाची रक्कम जास्त आहे.
लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. त्यामुळे अनेकांना 500 रुपये दंड भरणे अशक्य आहे. याचा विचार करून 200 रुपये दंडाची आकारण करण्यात यावी अशी उपसूचना मंजूर करण्यात आली आहे.