ओतूर – ओतूर (ता. जुन्नर) पोलीस ठाणे हद्दीत विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. आतापर्यंत 1 लाख 25 हजार रुपयांचा दंड वसूल करून 625 खटले दाखल केले आहे. या करवाईतून कोणाचीही गय केली जाणार नसल्याचा इशारा, सहायक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी दिला आहे.
सध्या करोनाचा वाढता प्रादुर्भाव शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात देखील होत असताना या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून ओतूर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करून विनामास्क फिरस्त्यांना चपराक दिली जात आहे. परशुराम कांबळे म्हणाले की, करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी काळजी घेण्याची नितांत गरज आहे;
मात्र अद्यापही जनता गांभीर्याने घेत नसल्याने संभाव्य धोका लक्षात घेऊन पोलिसांकडून ही कारवाई होत आहे. या कारवाईमध्ये पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र बनकर, अंकुश काळे, योगेश पाटेकर, अनंत, अमोल मडके, होमगार्ड गवारी यांचा समावेश होता. दरम्यान, पोलीस फक्त दंडात्मक कारवाई करीत नसून करोनाच्या बाबत जनजागृतीही करीत आहे, असे आवाहन कांबळे यांनी सांगितले.