दि.30 एप्रिलपर्यंत जमीन मोजणी पूर्ण करण्याचे आदेश
पुणे – महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतलेल्या केळवडे (ता. भोर) ते उर्से (ता. मावळ) या 68 किलोमीटर लांबीच्या पश्चिम रिंगरोडला आता गती मिळणार आहे. या रिंगरोडसाठी दि.30 एप्रिलपर्यंत मोजणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी प्रांताधिकारी यांना दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात रिंगरोडचा आढावा घेण्यात आला. यावेळी रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, भूसंपादन उपजिल्हाधिकारी प्रवीण साळुंखे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख राजेंद्र गोळे यांच्यासह हवेली, मावळ-मुळशी आणि भोरचे प्रांताधिकारी उपस्थित होते. या रिंगरोडसाठी सुमारे 750 हेक्टर जागेचे भूसंपादन करावे लागणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, रिंगरोडसाठी मोजणी सुरू करण्यापूर्वी सदर गावातील नागरिकासोबत बैठक घेऊन त्यांना प्रकल्पाची रूपरेषा सांगावी तसेच नागरिकांना असणाऱ्या शंकाचे समाधान करावे, जेणेकरून भूसंपादन, मोजणी प्रक्रियेला गती मिळेल.
मोजणी करतेवेळी संपादन होणाऱ्या जागेचे मूल्यांकन करण्यासाठी मोजणीवेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याने उपस्थित राहावे. यावेळी डॉ. पुलकुंडवार यांनी प्रकल्पाची माहिती, प्रक्रियेत विविध विभागांची जबाबदारी व समन्वय, प्रकल्पाची भूसंपादन प्रक्रिया, संयुक्त मोजणी प्रक्रिया आदींसह प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती दिली.