सरव्यवस्थापकासह माजी उपाध्यक्षास न्यायालयीन कोठडी
ओतूर – जिल्ह्यात गाजणारे महालक्ष्मी पतसंस्थेमधील अपहार प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले आहे. पतसंस्थेचा सरव्यवस्थापक व माजी उपाध्यक्ष यांना नुकतीच अटक करण्यात आली होती. त्यांना शनिवारी (दि. 5) खेड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांनी दिली.
सरव्यवस्थापक सत्यवान बेलोटे, माजी उपाध्यक्ष रामचंद्र हांडे असे न्यायालयीने कोठडी सुनावलेल्यांची नावे आहेत.
याबाबतची माहिती अशी की, जुन्नर तालुक्यातील उंब्रज येथील महालक्ष्मी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे संचालक मंडळ, व्यवस्थापक, अध्यक्ष, उपाध्यक्षांनी संगनमताने मार्च 2017 पर्यंत 30 कोटी 81 लाख 55 हजार रुपयांचा अपहार केला. यातील मुख्य आरोपी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष हनुमान हांडे यांच्यासह 30 जणांवर ओतूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
अनेक दिवस तपासानंतर हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले असल्याची माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक परशुराम कांबळे यांनी दिली. सरव्यवस्थापक बेलोटेस सोमवारी (दि. 31ऑगस्ट) पारनेर तालुक्यातील देवीभोयरे येथून तसेच माजी उपाध्यक्ष हांडेस मंगळवारी (दि. 1) नारायणगाव येथून आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केल्यानंतर त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. शनिवारी पोलीस कोठडी संपल्याने त्यांना खेड न्यायलयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.