एक वेगळं काम

संजय एक वेगळं व्यक्‍तिमत्त्व, शिक्षण वेगळं नि आवड वेगळी, काहीतरी नवीन करायचं, आनंद घ्यायचा व दुसऱ्यांनाही समाधान द्यायचं असं काहीतरी तो नेहमी करत असे. कोणतेही काम वाईट नसते व ते काम करणाऱ्या माणसाच्या भूमिकेत जावं आणि त्यांचे काम स्वत: करून आनंद घेणे यात वेगळीच मजा असते.

एका दुकानासमोर पाटी होती. “औषध पोहोचवायला मुलं हवी आहेत’ संजयने जाता-येताना ही पाटी पाहिली होती. त्याने ठरवलं जाऊन बघूयात तरी म्हणून तो मालकाला भेटला. मुळातच स्वभाव नम्र, वाकून नमस्कार केला व म्हणाला, “मालक मला काम हवं आहे, मला गरज आहे.’ मालक म्हणाले, “दुकानातून औषधे घ्यायची आणि शहरातील विविध भागातील मेडिकल स्टोअरमध्ये पोहोच करायची. यासाठी स्वत:ची सायकल हवी. आहे ना? संजयने मान होकारार्थी हलवली. मग ये उद्यापासून, असा हुकूम मालकाने सोडला.

संजयने मित्राची सायकल घेतली व दुसऱ्या दिवसापासून कामाला सुरुवात केली. सकाळी दुकान उघडायच्या आत संजय दुकानासमोर हजर असायचा. ऑर्डरप्रमाणे तो औषधे पिशव्यांमध्ये भरायचा आणि सायकलला लावून कामावर निघायचा. कधी दुकानाच्या जवळ तर कधी कधी दहा ते पंधरा किलोमीटरच्या मेडिकलमध्ये जाऊन तो ऑर्डर पोहोच करत असे. सर्व मुलांच्या अगोदर परत दुकानात हजर, यामुळे मालक त्याच्यावर खूप खूश होता. हळूहळू मालकाचा त्याच्यावर विश्‍वास बसला. मग संजय लवकर येऊन स्वत:च ऑर्डर तपासायचा आणि सर्वांचा माल भरून ठेवायचा. औषधे पोहोचवण्याच्या कामाचा अनुभव घेत असताना अनेक माणसे भेटली, त्यांचे स्वभाव कळले व असे करता करता जवळजवळ एक महिना उलटून गेला.

एके दिवशी सकाळी संजय दुकानात काम करत असताना मालकाने सांगितले, अरे आजपासून तू औषधे पोहोचवाला जाऊ नकोस, इथेच राहून मला मदत करत जा. संजयला आनंद झाला. आता त्याला दुकानातच काम करायचे होते. तो दररोज सकाळी लवकर येई, दुकानासमोर पाणी मारणे, दुकानाची झाडलोट करणे, याचबरोबर ऑर्डर घेणे व ऑर्डरप्रमाणे माल मुलांच्या पिशव्या देणे अशी सगळी कामे करू लागला. मालकाचा विश्‍वासू कामगार म्हणून त्याचा हेवा सगळ्यांना वाटत होता. मालकही त्याच्या कामावर खूश होते. हळूहळू गल्ल्यांच्या चाव्याही त्याच्या ताब्यात मालकाने दिल्या. दररोजचे हिशेब ठेवणे, बॅंकेत पैसे जमा करणे, या कामातही तो मदत करू लागला आणि संजयची जागा मालकाच्या शेजारच्या खुर्चीजवळ आली.

संजयला आता कामाला लागून जवळजवळ दीड महिना झाला होता. तो त्याचे स्वत:चे मूळ काम व घरचे काम दुकानातून घरी गेल्यावर करत होता. कामगार, औषधे पोहोचवणारा मुलगा ते त्या दुकानाचा व्यवस्थापक अशी जणू त्याची ओळख कमी कालावधीत झाली होती. खरंतर संजयला कामाची गरज नव्हती, तो उच्चशिक्षित मुलगा होता. नव्हे एका शाळेत गणित व विज्ञान विषय शिकवत असे आणि संस्थाही त्यांचीच होती. संस्थेच्या दोन शाळा होत्या. त्यांच्या सासूबाईंनी ही शाळा सुरू केली होती. आता संजयची उन्हाळ्याची दीड महिन्याची सुट्टी संपत आली होती. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात शाळा सुरू होणार होती. संजय दुकानाच्या जवळ आपली गाडी लावत असे आणि मग सायकलवर दुकानात येत असे. पुन्हा औषधांच्या पिशव्या सायकलवरून गाडीमध्ये न्यायचा व गाडीला लावून सर्व दुकानात पोहोचवून दुकानात सर्व मुलांच्या अगोदर येत होता.

आता संजयने या कामाचा आनंद घेतला, नव्हे एक वेगळी भूमिका केली व एक दिवस मालकांना सांगितले. मालक मी उद्यापासून कामावर येणार नाही. मालकास धक्का बसला. त्यांनी विचारले का रे? मालक मला एका शाळेत नोकरी लागली आहे. मालकालाही खूप आनंद झाला. त्याचे काम पाहून ते खूश होतेच, उद्यापासून त्यांची अडचण होणार होती. पण मालकाला आपल्या दुकानातील मुलगा नोकरीला लागला याचाच आनंद खूप होता.

संजय जेव्हा जेव्हा परत त्या दुकानात जातो, मालकाला, सर्व मुलांना भेटतो तेव्हा त्या सर्वांना त्याचे कौतुक वाटते. तसे तर आज जरी तो नोकरीस असला तरी त्याने त्याचे शिक्षण काम करून केलेले आहे, याची त्याला जाणीव आहे. स्वत:च्या सुट्टीच्या काळात, शाळा सुटल्यानंतर, मित्राच्या दुकानात जातो, तिथे त्यांना मदत करतो, मग कधी ते किराणा दुकान असेल तर कधी टिंबर मार्केट, तर कधी पुस्तकांचे दुकान असते. उद्देश एवढाच त्यांना कामात मदत करणे व नवनवीन अनुभव घेणे यामुळे माणसांचे स्वभाव कळतात व नवीन माणसे जोडली जातात. संजय सर मुळातच शाळेचे मुख्याध्यापक आहेत. जेव्हा ते आता औषध दुकान मालकाला सांगतात, मी शिक्षक म्हणून रुजू झालो पण आता मुख्याध्यापक आहे. तर मालकाची छाती भरून येते. दुकानात येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांना व इतर मुलांना ते सांगतात, “देखो ये लडका, मेरे दुकान में काम करता था। अभी एक स्कूल का हेडमास्टर बन गया।

अनिल गुंजाळ

Ads

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here