अरुण गोखले
आपण आपल्या घरातील देवदेवतांची नित्य पूजा करणे हे आपले आद्यकर्तव्य समजतो. माणूस हा श्रद्धावान असल्याने त्यास सगुण उपासना करण्यास फार आवडते. याच आवडीमधून देवदेवतांच्या सगुण मूर्ती, फोटो, प्रतिमा ह्यांना माणसाने देवघराबरोबरच स्वत:च्या मनातही स्थान दिले. तो त्यांची भक्तिभावाने पूजाअर्चा करू लागला.
देवाच्या पूजेचे नित्य आणि नैमित्तिक असे दोन प्रकार पडतात. त्यातील नित्यपूजा ही घरोघरी केली जाते. नैमित्तिक पूजा प्रासंगिक किंवा कोणत्या तरी निमित्याने केल्या जात असल्याने त्यांची गणती नैमित्तिक पूजेत होते. तसेच पूजेचेही एक स्वतंत्र शास्त्र असून त्यात पूजा केव्हा, कोणी, कशी करायची ह्याबद्दल मार्गदर्शन केले जाते. पूजेच्या उपचारांमध्ये पुढील उपचारांचा समावेश होतो. पूजेत आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमनीय, स्नान, वस्त्र, यज्ञोपवीत, अनुलेपन म्हणजेच गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, नमस्कार प्रदक्षिणा, आणि मंत्रपुष्पांजली असे एकूण सोळा उपचार समाविष्ट असतात. नित्यपूजेत पाच प्रकार येतात म्हणून त्यास पंचोपचार पूजा असे म्हणतात.
आपल्या संस्कृतीने आपल्याला नित्य देवपूजेप्रमाणेच निसर्ग, पंचतत्त्वे, वृक्ष, पर्वत, सरिता, सागर, नाग, गाय, वृषभ, यासारखे प्राणी, यांच्याही पूजा कराव्यात असे सांगून ठेवले आहे. त्यासाठी वर्षाकाठी काही खास दिवस, सणौत्सव, व्रतवैकल्ये ह्यांचे नियोजन करून दिलेले आहेत. उदा. नागपंचमी, वटपौर्णिमा, नारळी पौर्णिमा, वसूबारस, बैलपोळा, इत्यादी.
आता ही अशी रोज देवांची पूजा का करायची? तर त्या पूजेमागे आपल्या मनात ईश्वराबद्दल कृतज्ञतेचा भाव असायला हवा. आपल्याला मिळत असलेले सुखसमाधान, सौख्य, आनंद ह्या साऱ्या गोष्टी जरी आपण करीत असलेल्या कामाच्या कष्टाचे फळ असले तरी जे काही आपल्याला मिळाले आहे, मिळते आहे, ते ईश्वरच्या कृपेने लाभत आहे ही जाणीव प्रत्येकाच्या मनात हवी. पूजेत त्यागाची, समर्पणाची भावना हवी.
नित्याची देव पूजा ही प्रामुख्याने आपल्या घरात सुख, शांती, समाधान, आनंद लाभावे, सर्वांना उत्तम आरोग्य मिळावे, सर्व दुष्टशक्तींपासून आपले, आपल्या घराचे व सर्वांचे रक्षण व्हावे. आपल्या मानवी प्रयत्नांना ईश्वरी कृपेची जोड असावी ह्या कृतज्ञतेच्या भावनेतून ती करायला हवी.
अशा देवपूजेमुळे आपल्याला मन:शांती मिळणे, सर्वांच्या कल्याणाची भावना जागणे, मनातील वाईट अन् नकारात्मक विचार दूर होणे, देव माझा पाठिराखा आहे हा विश्वास बळावणे, हे फायदे मिळतात.