नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातील निवडणुकांमुळे गेल्या चार महिन्यांपासून भारतातील तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केलेली नाही. सध्याच्या इंधनाच्या जागतिक दरानुसार पेट्रोलच्या खरेदी आणि विक्री कंपनीमध्ये 12 रुपयाची तफावत असून जर पेट्रोलचे दर 12 रुपयांनी वाढविले तर तेल कंपन्यांच्या खर्चाची तोंडमिळवणी होईल असे एका अभ्यास अहवालात म्हटले आहे.
त्यासाठी पुढील आठवड्यात तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये किमान 12 रुपयांची वाढ करण्यावर विचार करु शकतात. या कंपन्यांना जर थोडाफार नफा व्हायचा असेल तर ही दरवाढ 15 रुपया पर्यंत करण्याची गरज आहे असे आयसीआयसीआय सिक्युरिटीज या संस्थेच्या अभ्यास अहवालात नमूद करण्यात आले आहे. याअगोदर जागतिक पातळीवर कच्च्या तेलाचे दर 81 डॉलर असताना भारतातील तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ केली होती.
त्यानंतर हे दर आता 120 डॉलरपर्यंत जाऊन आले आहेत. पुढच्या आठवड्यामध्ये उत्तर प्रदेशातील शेवटच्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्याची शक्यता असल्याचे जेपी मॉर्गन या संस्थेने म्हटले आहे. रशिया जागतीक उत्पादनाच्या 25 टक्के गॅस उत्पादन करतो. तर कच्चे तेल जागतीक उत्पादनाच्या दहा टक्के उत्पादन करतो.
यावर निर्बंध आल्यामुळे याचा थेट परिणाम गॅस आणि पेट्रोलच्या किमतीवर फक्त भारतातच नाही तर जागतिक पातळीवर होत आहे. त्यामुळे भारत, अमेरिका आणि इतर युरोपियन देशांनी तेल उत्पादन करणाऱ्या इतर देशांना तेलाचा पुरवठा वाढविण्याचा आग्रह केला आहे. अन्यथा जागतिक पातळीवर मोठा परिणाम होऊ शकतो