नवी दिल्ली – सेमीकंडक्टरचा तुटवडा व इतर कारणामुळे प्रवासी वाहनच्या विक्रीवर परिणाम कायम आहे. फेब्रुवारी महिन्यात प्रवासी वाहनांच्या किरकोळ विक्रीत आठ टक्क्यांची घट नोंदली गेली.
फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन या संघटनेचे अध्यक्ष विकेंश गुलाटी यांनी सांगितले की, फेब्रुवारी महिन्यामध्ये 2,38,096 इतकी प्रवासी वाहने विकली गेली.
गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये 2,58,337 इतकी प्रवासी वाहने विकली गेली होती. काही वाहनांच्या उत्पादनात वाढ झाली असली तरी ग्राहकांची जेवढी मागणी आहेत तेवढी वाहने बाजारात उपलब्ध नाहीत.
त्यातच रशिया- युक्रेन युद्धामुळे सेमीकंडक्टरचा तुटवडा आणखी वाढणार आहे. त्यामुळे वाहन क्षेत्राची परिस्थिती आगामी काळात अधिक बिकट होऊ शकते असे त्यांनी सांगितले. फेब्रुवारी महिन्यामध्ये दुचाकींची विक्री 10 टक्क्यांनी कमी होऊन 9,83,358 इतकी झाली आहे.
ग्राहकांची क्रयशक्ती कमी असताना बऱ्याच वाहन कंपन्यांनी वाहनाच्या दरात वाढ केल्यामुळे विक्रीवर परिणाम झाला असल्याचे दिसून येते.फेब्रुवारी महिन्यात ट्रॅक्टरची विक्री 18 टक्क्यांनी कमी झाली. या महिन्यामध्ये 50,304 ट्रॅक्टर विकले गेले.