वाघोली (प्रतिनिधी) – वाघोलीचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त गुरुवारी (दि. 17) भैरवनाथ मंदिराच्या शेजारी उभारण्यात आलेल्या आखाड्यात पैलवान व कुस्ती शौकीनांची गर्दी झाली होती. नवीन आखाड्याचे उद्घाटन वाघोली गावचे सुपुत्र महाराष्ट्र केसरी अभिजीत कटके यांच्या हस्ते व ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी महाराष्ट्रातील नामांकित मल्लांच्या कुस्त्या पाहावयास मिळाल्या.
श्री भैरवनाथ देवाचा उत्सव बुधवारी (दि. 16) व गुरुवारी (दि. 17) मोठ्या उत्साहात पार पडला. यावर्षी भरगच्च कार्यक्रमांसह जंगी कुस्त्यांचा आखाडाही पार पडला. कायमस्वरूपी कुस्ती आखाड्याचा उपाय काढण्यासाठी ग्रामस्थ व प्रशासनाच्या मदतीने भैरवनाथ मंदिराच्या शेजारी असणाऱ्या मोकळ्या जागेमध्ये कुस्त्यांचा आखाडा तयार करण्यात आला आहे.
वाघोलीच्या वैभवात भर पडणारा भव्य कुस्तीचा आखाडा ग्रामपंचायतीमार्फत तयार करण्यात आला आहे. आगामी काळात याच ठिकाणी भव्य असे क्रीडा संकुल उभारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. खेळाडूंसाठी व क्रीडा रसिकांसाठी ही मोठी पर्वणी असणार आहे.
– रामकृष्ण सातव पाटील (सदस्य, पुणे जिल्हा नियोजन समिती)
याठिकाणी वीजखांब उभारणी, संरक्षक भींत, प्रेक्षक गॅलरी, मुख्य व्यासपीठ तसेच 130 फुट बाय 130 फुट गोलाकार पक्के बांधकाम तयार करून त्यावर 70 फुट बाय 70 फुट गोलाकार मातीचा नवीन आखाडा तयार करण्यात आला आहे.