सुदैवाने जीवितहानी नाही; मात्र दुकान व टॅंकरचे मोठे नुकसान
उरुळी कांचन – उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील एलाईट चौकात इंडर्स्ट्रीींल पर्पज ऑईल केमिकलच्या टॅंकरचा हवेचा पाईप फुटून झालेल्या अपघातात टॅंकर उलटला. पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आज (मंगळवारी) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
हवेचा पाईप फुटल्याने चालकाचे टॅंकरवरील नियंत्रण सुटले व महामार्गाच्या बाजूला लावलेल्या लोखंडी जाळ्या तोडून एक रिक्षा, एक चायनीजचे दुकान, गॅरेजला धडक दिली. तसेच टॅंकरचे पाठीमागील टायर फुटल्याने टॅंकर उलटला. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी टॅंकरचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच इंडस्ट्रीअल पर्पज ऑईल हजार ते दीड हजार लिटर सांडले आहे.
कोकरूद्दीन मोहम्मद इस्माईल खान (वय 35, रा. वडाळा, मुंबई) असे टॅंकर चालकाचे नाव आहे. स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोकरूद्दीन खान हे टॅंकरमधून 25 हजार लिटर इंडस्ट्रीयल पर्पज ऑईल घेऊन मुंबईवरून हैद्राबाद या ठिकाणी जाण्यासाठी निघाले होते. पुणे – सोलापूर महामार्गावरून हैद्राबाद या ठिकाणी जात असताना सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन या ठिकाणी आले असता टॅंकरचा हवेचा पाईप एकदम फुटला.
यावेळी टॅंकर सुसाट असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. टॅंकरने महामार्गाच्या बाजूला असलेल्या जाळ्या तोडून रिक्षा, एक चायनीजचे दुकान, गॅरेजला धडक दिली. त्यातच टॅंकरचे पाठीमागील टायर फुटल्याने टॅंकर पलटी झाला. यामध्ये दुकानाचे व टॅंकरचे मोठे नुकसान झाले. टॅंकर उलटल्याने मोठ्या आवाजाने आजूबाजूचे लोक जमा झाले. अपघात झालेल्या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी टॅंकरच्या केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला नागरिकांनी बाहेर काढले.
यावेळी पुणे बाजूकडे जाणाऱ्या व सोलापूर बाजूकडे जाणाऱ्या दोन्ही बाजूला मोठी दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी झाली होती. या ठिकाणी तात्काळ कदम रुग्णवाहिका, कस्तुरी प्रतिष्ठान, लाईफ केयर या रुग्णवाहिका पोहोचल्या होत्या. स्थनिक नागरिकांनी घटनास्थळी पोहोचून खबरदारीचा उपाय म्हणून चालकाला बाहेर काढले. व त्याच्याकडे चौकशी केली. तसेच या अपघातात चालकाला कोणतीही दुखापत झाली नसल्याचे दिसून आले.