पुणे – महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या (बालभारती) संकेतस्थळाचे डोमेन विकणे आहे, अशी जाहिरात इंटरनेटवर झळकली. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाची एकच धांदल उडाली. अखेर मंगळवारी रात्री पुणे शहर सायबर पोलिसांकडे ऑनलाइन तक्रार नोंदविण्यात आलेली आहे.
बालभारतीच्या संकेतस्थळाचे डोमेन दोन हजार यूएस डॉलर किंमतीला विकणे आहे, अशी जाहिरात प्रसिद्ध झाली. बालभारतीचे डोमेन शिफ्ट झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले. बालभारतीकडून रिटेल क्लब या कंपनीद्वारे तांत्रिक बाबींची पूर्तता केली जात असते. बालभारतीचे अधिकृत डोमेने सन 2005 पासून नोंदणी करुन घेण्यात आले आहे. 16 फेब्रवारी 2023 रोजी डोमेनचे नूतनीकरण्याबाबतचे शुल्कही भरण्यात आले आहे.
मात्र, तरीही डोमेनबाबत विचित्र प्रकार घडल्याने अधिकाऱ्यांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येऊ लागले आहे. दरम्यान, डोमेन हस्तांतर आणि संकेतस्थळ हॅक केल्याबाबतची तक्रार बालभारतीच्या वतीने योगेश लिमये यांनी पुणे शहर सायबर पोलिसांकडे दाखल करण्यात आली आहे, असे बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी सांगितले. दरम्यान, बालभारतीच्या संकेतस्थळावर दररोज हजारो पालक आणि विद्यार्थी भेट देतात. त्यामुळे त्यांचीही या प्रकाराने फसवणूक होण्याची भीती आहे.
बालभारतीचे अधिकृत डोमेन विकण्याबाबत खोटी वेबसाइट तयार करुन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. हा फसवणुकीचा प्रकार आहे. याबाबत सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आलेली आहे, असे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे म्हणाले.