पिंपरी – आई-वडीलांचा सांभाळ न करणाऱ्या तसेच त्यांना शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या मुलगा व सूनेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बिजलीनगर, चिंचवड येथे घडली.
सचिन जगन्नाथ गिते (वय 41) आणि प्रियंका सचिन गिते (वय 36) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपी मुलगा आणि सुनेचे नाव आहे. जगन्नाथ सोनुती गिते (वय 75, सर्व रा. बिजलीनगर, चिंचवड) यांनी शुक्रवारी (दि. 16) याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 2016 ते 16 ऑक्टोबर 2020 या कालावधीत घडली.
आरोपी सचिन हा फिर्यादी यांचा लहान मुलगा आहे. 2016 पासून आरोपी सचिन आणि त्याची पत्नी प्रियंका यांनी फिर्यादी जगन्नाव व त्याची पत्नी सुशिला (वय 65) यांना वेळोवेळी शिवीगाळ करून मारहाण करीत धमकी दिली. तसेच फिर्यादी व त्यांची पत्नी ज्येष्ठ नागरिक असूनही त्यांचे पालन पोषण केले नाही म्हणून आरोपी मुलगा व सून यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.