इंदापूर, (प्रतिनिधी)- इंदापूर शहरातील प्रभाग क्रमांक एक व त्यामध्ये वार्ड क्रमांक एक मध्ये, डॉ. कदम हॉस्पिटल ते विशाल बोन्द्रे अपार्टमेंट पर्यंत असणार्या उघड्या गटारीचा नागरिकांना प्रचंड नाहक त्रास सोसावा लागत आहे. त्यामुळे वार्डातील समस्या कायम आहेत.
इंदापूर शहरातील सर्व भागातील विकास झाला; मात्र या वार्डातील अनेक समस्यांकडे नगरसेवकांनी मुद्दाम दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. नवीन वार्ड क्रमांक एक मधील वाढीव हद्दीतील भैरवनाथ नगरची अंडरग्राउंडची समस्या आहे. काम झालेले आहे. मात्र अंडरग्राउंडचे पाणी पुढे जाण्यास वाट नाही. त्यामुळे तेथील नागरिक त्रस्त आहेत. असे नागरिकांनी सांगितले. तसेच अनेक ठिकाणी लाईट पोलची समस्या आहे.
तसेच वार्डातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 5 समोर लाईटीचा डीपी शाळेजवळचा बसवला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना धोका निर्माण झाला आहे. तसेच इरिगेशन कॉलोनी मधील अंतर्गत रस्ता झाला नसल्याने, रहिवाशी त्रस्त आहेत. तसेच झालेल्या रस्त्यांना प्रचंड मोठे स्पीड ब्रेकर असल्याने रुग्ण त्रस्त झाले आहेत. तसेच झालेल्या अनेक रस्त्यांना पांढरे पट्टे नाहीत, त्यामुळे वाहतूक भरधाव वेगाने होत आहे.
मूकबधिर शाळा ते डॉ. पानबुडे हॉस्पिटल पर्यंतचा रस्ता पूर्ण झाला मात्र अल्पावधीतच उकराला गेल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. दलित वस्ती अंतर्गत झालेल्या रस्त्यांची देखील दयनीय अवस्था आहे. श्रीराम सोसायटीमधील अंतर्गत अनेक रस्ते राहिले आहेत. दैनंदिन रस्ते स्वच्छ होत नसल्याने वार्डात कचर्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. प्रभागामध्ये महतीनगर, इरिगेशन कॉलनी, पोलीस लाईन, डॉ. आबेडकर सोसायटी, इंद्रेश्वरनगर, दत्तनगर, परिमल सोसायटी, श्रीराम ससायटी, शंकर सोसायटी, सरकारी कॉर्टर्स, भैरवनाथनगर येथे सार्वजनिक स्वच्छता होत नसल्याने ठीक ठिकाणी कचर्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे.