मुंबई : नागपूरमध्ये भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. रामटेक भंडारा रोडवरील खंडाळा गावाजवळ भरधाव कारने धोकादायक पद्धतीने थांबलेल्या कंटेनर ट्रकला धडक दिल्याने हा अपघात झाला. मृतांमध्ये दहा महिन्यांचे बाळ, आठ वर्षीय मुलगा आणि 70 वर्षीय वृद्धाचा समावेश आहे.
नागपूर जवळच्या अरोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामटेक-भंडारा रस्त्यावर रविवारी सायंकाळी हा अपघात झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. कारमधील सर्व जण भंडारा जिल्ह्यातील साकोली इथले असून देवदर्शनासाठी ते रामटेकला आले होते. भंडाऱ्याकडे परत जात असताना खंडाळा गावाजवळ रस्त्यावर धोकादायक पद्धतीने उभ्या असलेल्या ट्रकला कारने मागून धडक दिली. ज्यात एका वृद्धासह दोन लहान मुलांचा मृत्यू झाला. परशराम भेंडारकर, हिमांशू भेंडारकर आणि भार्गवी बोंद्रे अशी मृतांची नावे आहेत.
ट्रक चालकाने कोणतेही इंडिकेटर न वापरता बेदरकारपणे वाहन रस्त्यावर उभं केल्याने इतर वाहनधारकांसाठी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती. त्यात मागून वेगात येणाऱ्या कारने ट्रकला धडक दिली. धडक एवढी भीषण होती की अपघातात कारमधील तीन जणांनी प्राण सोडले. तर सहा जण जखमी झाले आहेत. दरम्यान अपघातात कारच्या पुढील भागाचं मोठं नुकसान झालं आहे, अशी माहिती आरोली पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
या कारमध्ये पाच लहान मुलांसह नऊ जण प्रवास करत होते. अपघातात नऊ जण गंभीर जखमी झाले होते. सर्व जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं. परंतु तिथे पोहोचल्यावर डॉक्टरांनी वृद्धासह तिघांना मृत घोषित केले. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान अपघातग्रस्त कारमधील सर्व जण भंडारा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. तर दुसरीकडे पोलिसांनी संबंधित ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.