कराड – येथील वाखान परिसरातील शिंदे मळ्यात डॉ. एम. पी. शिंदे यांच्या घरात मध्यरात्री दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवत सशस्त्र दरोडा टाकला. यामध्ये सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा लाखोंचा एवज चोरट्यांनी लंपास केला. रविवारी मध्यरात्रीनंतर घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, पोलिसांनी अधिक तपासासाठी श्वान पथकासही पाचारण केले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कराड शहरातील वाखान परिसरातील शिंदे मळ्यात डॉ. एम. पी. शिंदे यांचा मोठा दवाखाना आहे. महाराष्ट्रातील अनेक रुग्ण याठिकाणी उपचारासाठी येत असतात. रविवार मध्यरात्रीनंतर 3.30 वाजण्याच्या सुमारास सुमारे 7 ते 8 दरोडेखोरांनी डॉ. शिंदे यांच्या घरात प्रवेश करून त्यांना चाकूचा धाक दाखवला. तसेच घरातील सुमारे 20 ते 25 लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. या घटनेने शिंदे मळा परिसरासह शहरात खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक बापू बांगर, सातारा गुन्हे शाखेचे अधिकारी, उपअधीक्षक अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, कराड शहर गुन्हे अन्वेषण शाखेचे राजू डांगे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. तसेच अधिक तपासासाठी श्वान पथकास पाचारण करण्यात आले आहे. दरम्यान, डॉ. शिंदे यांच्या राहत्या घरासह रुग्णालय व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे असल्यामुळे दरोडेखोर लवकरच हाती लागण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे