भोर – महाड मार्गावरील वरंधा घाटातील शिरगाव (ता.भोर) हद्दीत पुणे स्वारगेटहून भोरमार्गे महाड चिपळूणकडे जाणाऱ्या सतरा सिटर मीनीबसचा (एम एच ०८ ए पी १५३०) अपघात झाला आहे. हा अपघात शनिवारी मध्यरात्री दोनच्या दरम्यान झाला आहे.
चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने बस थेट दरीत कोसळली. ही दरी ५० ते ६० फूट खोल होती. मात्र धरणाच्या पाण्यापासून पाच फुटावर गाडी अदांतरीत अडकल्याने मोठा अनर्थ टळला आहे. बसमधील काही प्रवाश्यांना दुखापत झाली आहे. तर बस चालक जागीच ठार झाला आहे. गाडीत चालकासहीत दहा ते अकरा प्रवाशी होते. त्यातील तीन ते चार जण जखमी झालेत. जखमींना भोर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळतेय. अपघात झाल्यानंतर गाडीतील चालकासह चार जण दरीतून रस्त्यावर आले. रस्त्याने जाणार्या वाहनचालकाने अपघात स्थळापासून जवळच असलेल्या सह्याद्री हॉटेल मालकाला अपघाताची माहिती दिली. त्यानंतर लागलीच हॉटेल मालक दत्ता पोळ, अक्षय धुमाळ, भीमा पोळ, संतोष पवार या शिरगावच्या तरुणांनी
घटनास्थळी धाव घेऊन अधांतरीत असलेल्या बसला प्रथम दोरीने बांधले व त्यानंतर अपघातग्रस्त गाडीतीतील प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले.
तसेच घटनेची माहिती कळताच भोर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शंकर पाटील, पोलिस हवालदार दत्तात्रय खेंगरे, सुनिल चव्हाण,चेतन कुंभार, अतुल मोरे तसेच सह्याद्री रेस्क्यूचे सचिन देशमुख व टीमने घटनास्थळी पोचून अपघातातील व्यक्तींना बाहेर काढण्यास मदत करुन जखमींना रुग्णालयात पाठवले. यावेळी घटनास्थळी आंबवडे आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ अनिकेत मांगले, चिकन मंजुश्री चिकणे, दिलीप देवघरे हजर होते.