आशेचा अंकुर…! पुण्यात नवे करोनाबाधित हजाराच्या घरात

पुणे – शहरात दि. 9 मार्च रोजी 1 हजार 86 नवे करोनाबाधित आढळले होते. त्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी ही संख्या पुन्हा हजारावर आल्याने पुणेकरांच्या मनात सोमवारी आशेचे अंकुर फुटले. शहरात गेल्या चोवीस तासांत एक हजार 165 बाधितांची नोंद झाली आहे. तर चार हजार 10 जणांना डिस्चार्ज मिळाला. दिवसभरात 11 हजार 499 संशयितांची स्वॅब टेस्ट करण्यात आली आहे.

जानेवारी-फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत बाधितांची संख्या केवळ शेकड्यांनी होती. परंतु 9 मार्चला बाधितांच्या आकडेवारीने 1 हजाराचा टप्पा ओलांडला आणि त्यादिवशी 1 हजार 86 बाधितांची नोंद झाली. त्यानंतर लगेचच 17 मार्चला दोन हजारांचा टप्पा ओलांडला आणि तीनच दिवसांत तीन हजारांचा आकडा ओलांडला. 20 मार्चला 3 हजार 111 बाधितांची नोंद झाली.

दि.21 आणि 22 मार्चला संख्या थोडीशी कमी झाली. परंतु 23 मार्चनंतर पुन्हा बाधितांची संख्या वाढाली आणि 28 मार्चला रोजी साडेचार हजार रुग्णांची नोंद झाली. दि. 8 एप्रिल रोजी बाधितांच्या आकडेवारीचा कळस झाला आणि 7 हजार 10 एवढी संख्या नोंदवली गेली. त्यानंतर मात्र बाधितांची संख्या क्रमाक्रमाने कमी होण्यास सुरुवात झाली. काही चढ-उतार अनुभवत दि. 3 मेपासून बाधितांची वाढ वेगानेच कमी झाली.

अद्याप सव्वासहा हजार बाधित ऑक्‍सिजनवर
शहरात करोनाच्या सक्रिय बाधितांची 50 हजारांवर गेलेली संख्याही आता 30 हजार 836 झाली आहे. मात्र, या तुलनेत गंभीर रुग्णांची संख्या अद्याप स्थीर आहे. ती दीड हजारांच्या आसपास कायम आहे. सोमवारी 1 हजार 402 जणांची प्रकृती चिंताजनक होती. तर 6 हजार 236 रुग्ण ऑक्‍सिजनवर आहेत. दिवसभरात 74 मृतांची नोंद झाली त्यातील 23 पुण्याबाहेरील असून, शहरात आजपर्यंत 7 हजार 409 करोना मृतांची नोंद झाली आहे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.