पुणे – विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षेस पसंती

उपस्थितीचे प्रमाण 95 टक्‍क्‍यांच्या पुढे

पुणे -करोनाच्या पार्श्‍वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत यंदा ऑनलाइन परीक्षा घेण्यात येत आहे. विद्यापीठाच्या जवळपास 90 टक्‍के परीक्षा पूर्ण होत आहेत. या ऑनलाइन परीक्षेस उपस्थितीचे प्रमाण 95 टक्‍क्‍यांच्या पुढे आहे. त्यामुळे प्रत्यक्ष वर्गात लेखी परीक्षेपेक्षा ऑनलाइन परीक्षेस विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत आहे.

पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे अहमदनगर व नाशिक या तीनही जिल्ह्यांमधील संलग्न महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या प्रथम सत्राच्या परीक्षा 10 एप्रिल रोजी सुरू झाल्या. या परीक्षा सुरू होऊन बरोबर एक महिना पूर्ण होत आहे. विद्यापीठाच्या सुमारे 90 टक्‍के परीक्षा संपल्या असून, आता केवळ कला व वाणिज्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा बाकी आहेत. त्यामुळे विद्यापीठाने परीक्षांच्या निकालाची प्रक्रिया सुरू केली आहे.

विद्यापीठातर्फे सुमारे साडेपाच लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जात आहे. अभियांत्रिकी, व्यवस्थापनशास्त्र, विज्ञान, औषधनिर्माण शास्त्र, विधी आदी अभ्यासक्रमाच्या पदवी व पदव्युत्तर पदवीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. या सर्व अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा संपली आहे. तसेच परीक्षेदरम्यान काही तांत्रिक कारणांमुळे अडचण आलेल्या सुमारे चौदाशे विद्यार्थ्यांच्या परीक्षा 16 मेनंतर घेण्याचे नियोजन आहे.

“प्रॉक्‍टर्ड’ प्रणालीमुळे गैरप्रकारांना पायबंद
विद्यापीठातर्फे ऑफलाइन पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या परीक्षांना सुमारे 80 ते 85 टक्‍केच विद्यार्थी उपस्थित असतात. मात्र, ऑनलाइन परीक्षा घेतल्या जात असल्यामुळे उपस्थितीचे प्रमाण सरासरी 95 टक्‍क्‍यांपर्यंत गेले आहे. त्यामुळे ऑफलाइनपेक्षा ऑनलाइन परीक्षांना विद्यार्थ्यांची उपस्थिती जास्त असल्याचे दिसून येत आहे. ऑनलाइन परीक्षा घेत असताना प्रॉक्‍टर्ड या संगणक प्रणालीद्वारे करडी नजर ठेवली जात आहे. त्यामुळे परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्यांवर पायबंद बसला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.