सिंहगड रस्ता, दि. 19 (प्रतिनिधी) -नांदेड-शिवणे गावाला जोडणाऱ्या 40 वर्षे जुन्या असलेल्या पुलाचे रूंदीकरणाचे काम सुमारे दीड कोटी रुपये निधी खर्च करून करण्यात आले. याचे लोकार्पण मार्च महिन्यात एका राजकीय नेत्याच्या हस्ते मोठा गाजावाजा करून करण्यात आले होते. परंतु, दोन-तीन दिवसांपूर्वी या पुलाचा स्लॅब पूर्णपणे उखडला आहे.
अवघ्या पाच महिन्यांत पुलावरील स्लॅब निघाल्याने याची दुरूस्ती कोण करणार? संबंधीत ठेकेदारास काळ्या यादीत टाकून दीड कोटी रुपये प्रशासन वसूल करणार का? असे प्रश्न वाहन चालकांसह स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केले जाऊ लागले आहेत.
नांदेड-शिवणे गावाला जोडणारा पूल उखडल्याने वाहन चालकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे नांदेड येथील नागरिक हनुमंत वाल्हेकर, अविनाश लगड, अतुल कारले यांनी या पुलाच्या कामावर वापरलेल्या निधीचे “ऑडिट’ करावे तसेच संबंधित ठेकेदाराकडून निधी वसूल करावा किंवा त्यास पूल पुन्हा दुरुस्त करण्याची सूचना करावी.
हा पूल साधारण 40 वर्षे जुना असल्याने याचे “स्ट्रक्चर ऑडिट’ त्वरित करण्यात यावे. त्यानुसार सुरक्षेच्या उपाययोजनांसह नव्याने काम करण्यात यावे, अशी मागणी जिल्हा परिषद प्रशासकांकडे केली आहे.
नागरिक म्हणतात की…
उद्घाटनाची घाई असल्यामुळे राजकीय दबाव होता, त्यामुळे या पुलाचे काम घाईघाईने उरकण्यात आले आहे. या पुलाला दोन्ही बाजूने संरक्षक कठडे आणि जाळ्या बसविलेल्या नाहीत. खडक फोडून पूल बांधला गेला असता तर पाणी पुलावरून गेले नसते, यातून या कामात त्रुटी दिसते. कॉंक्रिटीकरणात स्टीलचा वापर केला गेलेला नाही, दोन स्लॅबला जोडण्यासाठी केमिकल, जाळीचा वापर केला गेलेला नाही, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
हा पूल बरेच दिवस पाण्याखाली होता, त्यामुळे स्लॅबमध्ये पाणी गेले असावे तसेच स्लॅब भरताना तो व्यवस्थित भरला गेलेला नाही. दोन-तीन टप्प्यात भरला गेल्याने तो एकजीव झालेला नाही. या पुलाचा दोषदायित्व कालावधी दोन वर्षे इतका आहे, त्यामुळे संबंधित कंत्राटदाराकडूनच पुन्हा काम करून घेण्यात येईल. या पुलाचे “स्ट्रक्चर ऑडिट’ झालेले नाही, तेही करून घेण्यात येईल. पाऊस थांबला की ही कामे त्वरित सुरू करण्यात येतील.
– युवराज देसाई, जि.प.चे कार्यकारी अभियंता