मुंबई – करोनाच्या प्रादुर्भाव वाढ असल्याने आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण येत आहे. सध्या करोनाबाधितांच्या उपचारासाठी वेगवेगळ्या औषधांची चाचणी केली जात आहे. अशातच रेमडेसिवीर हे औषध करोनाच्या रुग्णांसाठी फायदेशीर असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. त्यामुळे राज्य सरकारने या औषधाची दहा इंजेक्शन बांगलादेशकडून खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने (सेंट्रल ड्रग्ज स्टॅण्डर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन) या औषधीची अवैधपणे बांगलादेशातून आयात करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या खरेदीला ब्रेक लागला आहे.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, करोनाचा प्रार्दुभाव वाढत असून, करोनाची लागण झालेले असंख्य रुग्ण गुणकारी असलेल्या रेमडेसिवीर या औषधीची बांगलादेशातून आयात करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने (सेंट्रल ड्रग्ज स्टॅण्डर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन) अवैधपणे पुरवण्यात येणारी औषधी रोखण्यात येईल, असे म्हटले आहे.
बांगलादेशातील रेमडेसिवीर उत्पादक कंपन्यांना कोणतीही परवानगी नाही. त्यामुळे ते कसे आयात करता येईल? असे सेंट्रल ड्रग्ज स्टॅण्डर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर माहिती दिली.
सेंट्रल ड्रग्ज स्टॅण्डर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन सध्या भारतातच जेनेरिक औषध उत्पादक कंपन्यांनी बनवलेल्या रेमडेसिवीरच्या गुणवत्तेची चाचणी करीत आहे. त्यामुळे सध्या मान्यता नसलेल्या कंपन्यांकडून रेमडेसिवीर औषधाची आयात रोखण्याकडे प्रामुख्याने लक्ष दिले जाणार आहे, असे या अधिकाऱ्यानं सांगितले.
दरम्यान, रेमडेसिवीर हे औषध करोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी फायदेशीर असल्याचे सांगत राज्य सरकार रेमडेसिवीरचे 10,000 इंजेक्शन खरेदी करणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी 6 जून रोजी दिली होती.