Uddhav Thackeray Home Matoshree : ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर मोठा घातपाताचा प्रयत्न करणार असल्याचा फोन महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला दोन दिवसांपूर्वी आला होता. धमकी देणारे 4 ते 5 जण उर्दूत बोलत होते, अशी माहिती कंट्रोल रुमला फोन करणाऱ्या व्यक्तीनं दिली होती.
फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीनं दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून गुजरातला जाणाऱ्या ट्रेनमध्ये 4 ते 5 जण प्रवास करत असून ते मातोश्रीबाहेर घातपात घडवून आणण्याबाबत बोलत होते. त्यांचं संभाषण कानावर पडल्यानं त्या व्यक्तीनं ही संपूर्ण माहिती तात्काळ महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला फोन करुन दिली.
मुंबहून गुजरातला जाणाऱ्या ट्रेनमधून प्रवास करणारे 4 ते 5 जण उर्दू भाषेत बोलत होते. तसेच, मुंबई भायखळ्यातील मोहम्मद अली रोडवर एक खोली भाड्यानं घेण्याबाबतही ते बोलत होते, असा दावाही फोन करणाऱ्या व्यक्तीनं केला आहे. या माहितीनंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता या प्रकरणात लव्हस्टोरीचा अँगल असल्याचं समोर आलं आहे.
गुजरात ते मुंबई ट्रेनमधून चार ते पाच तरुणांचा ग्रुप मुंबईला येत असून ते मातोश्रीवर घातपात घडवणार आहेत, असा कॉल महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला आला होता. या कॉल करणाऱ्या व्यक्तीने एक फोन नंबर पोलिसांना दिला होता.
पोलिसांनी त्या नंबर धारकाची चौकशी केली. चौकशीत अज्ञात व्यक्तीने पोलिसांना ज्या व्यक्तीचा नंबर दिला होता. त्याच्या प्रेयसीने नकार दिल्यानंतर रागाच्या भरात हा कॉल केल्याचं समोर आलं आहे. आता पोलीस या आरोपीचा शोध घेत असल्याचं सांगण्यात आलं आहे.