नेवासा काँग्रेसची जिल्हाधिकारी यांच्याकडे कारवाईची मागणी
नेवासा : नेवासा नगरपंचायतने नेवासा शहरात केलेल्या वृक्ष लागवडीची चौकशी करण्यात यावी अशी मागणी नेवासा काँग्रेसने निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली.
सविस्तर वृत्त असे की, नेवासा नगरपंचायतकडून मागील तीन वर्षात चौदाव्या वित्त आयोगाच्या अंतर्गत नेवासा शहरात वृक्ष लागवडी संदर्भात तब्बल पंचावन्न लाखाच्या निविदा काढण्यात आल्या तसेच पंचविस लाखाचे बिले देखिल अदा करण्यात आली. परंतु नेवासा नगरपंचायत हद्दीमध्ये आजपर्यंत काढण्यात आलेल्या निविदा नुसार एक लाखाचे देखिल वृक्ष लावले गेले नाही जे वृक्ष लावले ते फक्त नावापुरतेच. वृक्ष लावल्यानंतर सदर ठेकेदाराने त्याकडे डोकुनही बघितले नाही.
लावलेले वृक्ष योग्य सवर्धन न केल्याने जळून देखिल गेली. वृक्ष लागवडीच्या नावाखाली फक्त खोट्या निविदा व खोटी बिले काढून मोठा भ्रष्ट्राचार नगरपंचायतीने व सदर ठेकेदाराने केला.माहिती अधिकारात प्राप्त केलेल्या माहिती नुसार चौदाव्या वित्त आयोगाच्या अंतर्गत नगरपंचायतीकडून तब्बल पंचावन्न लाख रुपयांच्या वृक्ष लागवडीची निविदा काढण्यात आली. निविदेतील करार नाम्यातील व अंदाजपत्रकातील तरतुदी नुसार संपुर्ण झाडे लावून झाल्यावर पन्नास टक्के रक्कम ठेकेदारास अदा करण्यात येइल अशी तरतूद करण्यात आली होती.
तर पन्नास टक्के रक्कम संपुर्ण झाडे लावून झाल्यावर व पुर्ण संगोपन व संवर्धन केल्यानंतर व टप्प्याटप्प्याने ठेकेदारास अदा करण्यात येइल अशी तरतूद करण्यात आली होती.त्यानुसार पंचावन्न लाखातील तब्बल पंचवीस लाख रुपये ठेकेदारास रक्कम वितरित देखिल करण्यात आली. परंतु पंचवीस लाखाची झाडे कुठे गेली हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.याशिवाय लावलेल्या वृक्षाकडे कोणीही डोकुन सुद्धा पाहिले नाही. फक्त बील काढण्याची घाई करण्यात आली.
सर्व प्रकरण बघता वृक्ष लागवडीच्या नावाखाली महाघोटाळा करण्यात आल्याचे दिसून येत आहे.या पुर्वी वृक्ष लागवड प्रकरणाची नेवासा काँग्रेसने नगरपंचायत मुख्याधिकारी यांच्याकडे चौकशीची मागणी केली होती. परंतु यावर कोणत्याही प्रकारची कारवाई न केल्याने काँग्रेस कमिटीने जिल्हाधिकारी यांची समक्ष भेट घेवुन नेवासा नगर पंचायतीने वृक्ष लागवडीच्या नावाखाली केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी व दोषी ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले. निवेदनावेळी नेवासा काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी माळवदे,शहराध्यक्ष रंजन जाधव, महीला अध्यक्ष शोभा पातारे,उपाध्यक्ष सतिष तऱ्हाळ, सोशल मीडियाचे सचिन बोर्डे, संजय होडगर, मुसा बागवान, जिल्हा काँग्रेसचे संदीप मोटे, सुदामराव कदम, कार्लस साठे, अंजुम पटेल, इम्रान पटेल, भगीरथ दाने, संतोष बर्डे, शाम मोरे ,महीला काँग्रेसच्या मिरा वडागळे, ज्योती भोसले, संगीता चांदणे, अर्चना बर्डे, आदीसह शहरातील नागरिक उपस्थित होते.
एक लाखाची झाडे दाखवा व एक लाख मिळवा नगरपंचायतीकडून कागदोपत्री पंचावन्न लाखाचे वृक्ष लागवड केली गेली त्यापैकी एक लाखाचे सुध्दा वृक्ष लावले नाही. वृक्ष लागवडीमध्ये मोठा भ्रष्टाचार नगरपंचायत व ठेकेदार यांच्या संगनमताने झाला आहे. वेळोवेळी बील काढण्यात आली, पंचावन्न लाखापैकी एक लाखाचे वृक्ष दाखवा व एक लाख बक्षीस मिळवा असे आवाहन करतो. ह्या घोटाळ्याचा संपूर्ण छडा लावून दोशीवर कारवाई झाल्याशिवाय काँग्रेस कमिटी शांत बसणार नाही
– संभाजी माळवदे ,अध्यक्ष नेवासा तालुका काँग्रेस कमिटी