पिंपरी – स्वच्छ सर्वेक्षण 2020 बाबतची जनजागृती आता हायड्रोजन किंवा हेलिअम बलून्सद्वारे केली जाणार आहे. त्यासाठी पावणेसहा लाख रुपयांची उधपट्टी करण्यात येणार आहे. महापालिकेच्या शहरातील मुख्य दहा इमारतींवर 10 बलून लावण्यात येणार असून, बलून खरेदी आणि त्याचे रिफलिंग यासाठी तब्बल सहा लाख रुपये खर्च येणार आहे.
महापालिकेतर्फे स्वच्छ सर्वेक्षण 2020 हे नागरी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाबाबत जनतेमध्ये जागृती व्हावी आणि शहर अधिक स्वच्छ व्हावे, यासाठी हायड्रोजन किंवा हेलियम बलून्सद्वारे करण्याचा निर्णय प्रशासनातर्फे घेण्यात आला आहे. त्यामुळे हे कामकाज कोटेशन पद्धतीने करण्यासाठी 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालवधीत दरपत्रक मागविण्यात आले. त्यानुसार एकूण चार संस्थांनी दरपत्रक सादर केले. त्यामध्ये सर्वाधिक कमी दर मेसर्स ट्रू व्हीजन ग्राफिक्स यांचे प्राप्त झाले. त्यामुळे त्यांच्याकडूनच हायड्रोजन किंवा हेलिअम बलून्सद्वारे जनजागृती करून घेण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत महापालिका मुख्य इमारत, तसेच आठ क्षेत्रीय कार्यालय आणि यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय अशा दहा इमारतींवर हे बलून्स लावून जनजागृती करण्यात येणार आहे.
या कामासाठी संस्थेला 15 फूट आकाराच्या प्रति बलून 47 हजार 500 रुपयांनुसार 4 लाख 75 हजार रुपये, तर बलूनच्या रिफलींगसाठी प्रतिनग 2200 रुपये नुसार 50 रिफिलिंगसाठी 1 लाख 10 हजार रुपये देण्यात येणार आहेत. असा एकूण 5 लाख 85 हजार रुपये इतका खर्च येणार आहे. त्याला स्थायीने मंजुरी दिली आहे.