मंचर – मंचर (ता. आंबेगाव) येथे आढळलेल्या करोनाबाधित महिलेची प्रसूती झाली असून, तिला कन्यारत्न प्राप्त झाले आहे. बाळाला करोनाचा संसर्ग झालेला नसून, बाळ सुखरूप असल्याचे सांगण्यात आले आहे. या बाळाचा सांभाळ करण्याची जबाबदारी मंचर ग्रामपंचायतीच्या महिला कर्मचाऱ्यांनी स्वीकारली आहे.
शहरामध्ये मुंबईहून प्रसूतीसाठी आलेली गर्भवती महिलाबाधित आढळल्यामुळे तिला उपचारासाठी पिंपरी-चिंचवड येथील वायसीएम रुग्णालयात सरपंच दत्ता गांजाळे यांच्या पुढाकाराने पाठविले होते.जा महिलेची प्रसूती झालेली असून तिला कन्यारत्न प्राप्त झाले आहे. बाळ पूर्णपणे ठीक आहे. या बाळाला वायसीएम रुग्णालयातून डिस्चार्ज दिला.
मात्र, आईला डिस्चार्ज मिळाला नसल्यामुळे महिलेच्या नातेवाइकांचा रिपोर्ट अजून तरी प्राप्त झाला नाही. या बाळाला सांभाळण्याची जबाबदारी महिला कर्मचारी अर्चना बेंडे व स्नेहा मिसाळ यांनी स्वीकारली. जीव धोक्यात घालून या महिला कर्मचाऱ्यांनी बाळाला वायसीएम रुग्णालयातून आणले असून, सध्या हे बाळ मंचर ग्रामपंचायतमध्ये आहे. महिलेच्या नातेवाइकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर बाळ त्यांच्या कुटुंबाच्या स्वाधीन केले जाईल.