एका महिन्यात वाढले 80 टक्‍के रुग्ण

एकूण 921 :  अवघ्या तीस दिवसांमध्ये 744 जणांना लागण

पिंपरी – आज “करोना’ला शहरात प्रवेश करुन तीन महिने पूर्ण झाले आहेत. सुरुवातीचे दोन महिने संथ गतीने प्रवास करणाऱ्या करोनाने आता मात्र उसळी घेतली आहे. शहरात एकूण “करोनाबाधितां’चा आकडा नऊशेचा टप्पा ओलांडत 921 वर जाऊन पोहचला आहे. गेल्या एक महिन्यात म्हणजेच 10 मे ते 10 जून या काळात “करोना’ने आपला कहर दाखविला आणि एकूण रुग्णांपैकी 80.78 टक्‍के रुग्णांना याच काळात लागण झाल्याचे समोर आले. याचाच अर्थ की दोन महिन्यात केवळ वीस टक्‍के तर एका महिन्यात 80 टक्‍के रुग्ण वाढले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये 11 मार्च रोजी “करोना’ने शिरकाव केला. सुरुवातीला मंद गतीने वाटचाल करत असलेल्या मार्च महिन्याच्या अखेरीस संपुष्टात येईल, असे वाटत असताना “करोना’ने पुन्हा वेग वाढविला होता. “करोना’ने गेल्या तीन महिन्यांपासून शहरात मुक्‍काम ठोकला आहे. सुरुवातीचे दोन महिने इतर शहरांच्या तुलनेत पिंपरी-चिंचवडने “करोना’ला जास्त वाढू दिले नव्हते. परंतु गेला एक महिना शहरासाठी चिंतेचा ठरला आहे. 10 मे पर्यंत शहरातील केवळ 177 रुग्णांना “करोना’ची लागण झाली होती. परंतु 10 जूनपर्यंत यात नव्या 744 रुग्णांची भर पडली आणि एकूण रुग्णांपैकी 80.78 टक्‍के रुग्ण हे या एका महिन्याच्या काळात वाढले आहेत.

महसूल पडला महागात
दोन महिने सरकारचे उत्पन्न पूर्णपणे ठप्प झाले होते. यामुळे सरकारने दारु विक्रीस परवानगी दिली. अनेक दिवस घरातच बसून असलेले नागरिक दारु विक्रीला परवानगी मिळताच रस्त्यावर उतरले. दारुच्या दुकानांबाहेर अभूतपूर्व अशी गर्दी पहावयास मिळाली होती. सोशल डिस्टिन्सिंगचा पुरता फज्जा दारु विक्रीने उडवून दिला होता. त्यानंतर लॉकडाऊन असतानाही शहरातील रस्त्यांवर गर्दी दिसू लागली. सुरुवातीच्या काळात पोलीस आणि प्रशासनाने “लॉकडाऊन’च्या नियमांची सख्तीने अंमलबजावणी करुन घेतली होती. परंतु दारुविक्रीला परवानगी मिळताच परिस्थिती पोलीस आणि प्रशासनाच्या हाताबाहेर गेली आणि गर्दी रोखण्यात त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. सरकारला दारु विक्रीच्या माध्यमातून मिळणारा महसूल शहरासाठी मात्र खूप महागात पडला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.