आळंदी -शहरातील मृतझालेल्या महिलेचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून करोनाला रोखणाऱ्या अलंकापुरीत अखेर करोनाचा शिरकाव झाल्याने आळंदीकर भयभीत झाले आहे. दरम्यान, खबदारीचे उपाय म्हणून महिलेच्या संपर्कात आलेल्या 16 जणांपैकी 8 जणांना स्वॅब तपासणीसाठी महाळुंगे इंगळे येथील कोव्हिड सेंटरमध्ये तर 8 जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली.
संबंधित महिला अनेक दिवसांपासून आजारी होती. उपचारासाठी ती आळंदीत व बाहेरच्या अनेक रुग्णालयात फिरली होती. त्याच दरम्यान, एका खासगी रुग्णालयात तिची करोना चाचणी केली असता अहवाल निगेटिव्ह आला होते. त्यानंतर घरी आल्यावर श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने तिला चाकणच्या दवाखान्यात दाखल केले होते व तेथेच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांनतर पाच लोकांच्या उपस्थितीत महिलेचा आळंदीत अंत्यविधी देखील करण्यात आला होता. मयत झाल्यानंतर त्यांचा स्वॅब घेतला होता त्याचा अहवाल मंगळवारी (दि. 9) पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.
संबंधित महिला राहण्यास असलेला परिसर कंटेन्मेंट झोन घोषित करून रस्ता बंद करणार आला आहे. सर्व व्यवहार बंद ठेवले असून परिसर बफर झोन घोषित करण्यात आहे. मात्र, यातील दुकाने व व्यवहार सुरू ठेवता येणार आहेत, असे मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी सांगितले.