नवी दिल्ली – बिहार विधानसभा निवडणुकांमधील १२०० उमेदवारांनी आपल्याविरोधात फौजदारी स्वरूपाचे खटले दाखल असल्याची माहिती जाहीर केली आहे. यातील ११५ जणांविरोधात महिलांविरोधी तर ७३ उमेदवारांविरोधात खुनाचे गुन्हे दाखल आहेत. याबाबतची माहिती असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स संस्थेतर्फे (एडीआर) जाहीर करण्यात आली आहे.
एडीआरने दिलेल्या माहितीनुसार, पडताळणी करण्यात आलेल्या ३७२२ उमेदवारांपैकी १२०१ (३२ टक्के) उमेदवारांनी आपल्याविरोधात फौजदारी स्वरूपाचे खटले दाखल असल्याची माहिती दिली. २०१५ विधानसभा निवडणुकांमध्ये ३४५० उमेदवारांची पडताळणी करण्यात आली होती. त्यातील १०३८ (३० टक्के) उमेदवारांनी आपल्याविरोधात फौजदारी खटले दाखल असल्याचं जाहीर केलं होत.
९१५ उमेदवारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे
यंदाच्या विधानसभा निवडणुकांमधील उमेदवारांपैकी ९१५ (२५ टक्के) उमेदवारांनी आपल्याविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचं जाहीर केलं आहे. गंभीर गुन्ह्यांमध्ये ५ वर्षांहून अधिक वर्ष कारावासाची शिक्षा असणाऱ्या अजामीनपात्र गुन्ह्यांचा समावेश होतो. २०१५ विधानसभा निवडणुकांमध्ये अशा प्रकारचे गुन्हे दाखल असलेल्या ७९६ (२३ टक्के) उमेदवारांचा समावेश होता. अशी माहितीही एडीआरच्या अहवालात देण्यात आली आहे.
१२ उमेदवारांवर बलात्कारसबंधित गुन्हे
बिहार विधानसभेच्या रणसंग्रामात उतरलेल्या ११५ उमेदवारांनी आपल्याविरोधात महिलांविरोधी गुन्हे दाखल असल्याचं जाहीर केलंय. यातील १२ उमेदवारांनी त्यांच्यावर बलात्कार संबंधीचे गुन्हे (भारतीय दंडसंहितेच्या कलम ३७६ अंतर्गत ) असल्याची माहिती दिली आहे.
७३ उमेदवारांविरोधात ३०२
एडीआरच्या अहवालामध्ये, “७३ उमेदवारांनी आपल्याविरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम ३०२ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल असल्याचं सांगितलंय तर २७८ जणांनी खुनाचा प्रयत्न केल्याबाबतचे गुन्हे दाखल असल्याचं म्हंटलंय.