मुंबई – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत ट्विट करून त्यांनी माहिती दिली आहे. माझी कोविड ची टेस्ट पाॅझिटिव्ह आली आहे. क्वारंटाईन झालो असून डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू आहेत, असे फडणवीस यांनी ट्विट करून सांगितले आहे. त्यांनी गिरीश महाजन यांना एक शब्द दिला होता. फडणवीस म्हणाले होते, मला कोरोनाची लागण झाल्यास सरकारी रूग्णालायत दाखल करा. त्यानुसार फडणवीस यांनी आपला शब्द पाळला असून ते सरकारी रूग्णालयात उपचार घेत आहेत.
‘गिरीश, मला कोरोना झाला तर मुंबईत सरकारी रूग्णालयात दाखल करा. खासगी रूग्णालयात दाखल करू नका,’ असं देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे जवळचे सहकारी गिरीश महाजन यांना फोन करून सांगितलं होतं.
फडणवीस यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर नेटिझन्सकडून त्यांना त्यांच्या जुन्या वक्तव्याची आठवण करून दिली जात आहे. तसेच, ते सरकारी रूग्णालयात उपचार घेणार का, असा प्रश्नही विचारण्यात आला. मात्र, फडणवीस यांनी आपला शब्द पाळला असून ते मुंबईतील सेंट जाॅर्ज हाॅस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. सेंट जाॅर्ज हे सरकारी हाॅस्पिटल आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी चाहत्यांची प्रार्थना
देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच ते आजारातून लवकर बरे व्हावेत यासाठी चाहत्यांकडून प्रार्थना करण्यात येत आहे. Get Well Soon असे लिहून फडणवीस लवकर बरे व्हावेत यासाठी चाहत्यांकडून प्रार्थना करण्यात येत आहे.