वॉशिंग्टन – उत्तर भारतातील बिहार विधानसभा निवडणुकीत करोनाव्हायरसच्या रुग्णांना आपण मोफत लस देऊ, असे सांगणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्याने वादळ उठले होते. तसेच वादळ आता अमेरिकन राष्ट्रध्यपदाच्या निवडणुकीत उठले आहे. विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले ज्यो बायडेन यांनी डेलावेयरच्या विलमिंग्टन येथील एका प्रचारसभेत सांगितले की, कोरोना नियंत्रित करण्याच्या प्रकरणात ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशन पूर्णपणे अपयशी ठरले असून जर त्यांच्या पक्षाला देशभरच्या निवडणुकीत यश मिळाले, तर सर्व नागरिकांना करोनावरील लस मोफत दिली जाईल, मग त्या रुग्णाचा विमा असो किंवा नसो.
अमेरिकेत 3 नोव्हेंबरला होणाऱ्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकांमध्ये कोरोना व्हायरस सर्वात मोठा मुद्दा बनत असल्याचे दिसत आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपली खुर्ची वाचवण्याच्या प्रयत्नांत आहेत, ज्यो बायडेन यांनी ट्रम्प यांना मात देण्याची भरपूर तयारी केल्याचे दिसून येत आहे. बायडेन म्हणतात की, मी म्हणतो की करोनाची साथ नियंत्रित करण्याच्या मुद्दयावर ट्रम्प पूर्णपणे अयशस्वी झाले. अमेरिकेत कोरोनामुळे 2 लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे ही गोष्ट कोण नाकारेल. राष्ट्राध्यक्ष अनेक महिन्यांपासून म्हणत आहेत की, कोरोना व्हायरस लवकरच संपणार आहे, आपण यावर नियंत्रण मिळवू. मात्र असे कधी होईल?
बायडेन असेही म्हणाले की, मी विश्वास देतो की, व्हॅक्सिनची खरेदी पूर्णपणे फेडरल गव्हमेंट करेल. ज्यांना गरज आहे त्यांना अगोदर व्हॅक्सिन देण्यात येईल. आपल्या समोर मोठा धोका आहे. येणाऱ्या हिवाळ्यात व्हायरस जास्त धोकादायक ठरु शकतो. अमेरिकेने यासाठी तयार राहायला हवे. विद्यमान सरकार दोन लाख लोकांना मरण्यापासून वाचवू शकत होते. पण ते तसे करु शकले नाहीत, हे आपले दुर्दैव आहे.