पुणे – स्विफ्ट कार आडवी घालून मालट्रक आडवून पळवून नेल्याप्रकरणात अटकेत असलेल्याला सत्र न्यायाधीश ए.एम. अंबळकर यांनी 25 हजार रुपयांचा जामीन मंजुर केला. चाकण पोलिसांनी या प्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.
विशाल अरूण कांबळे (वय 30, रा. चिखली, मूळ. केज. जि. बेड) असे त्याचे नाव आहे. त्याने ऍड. श्रीकृष्ण घुगे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. या प्रकरणात आणखी आठ जणांवर गुन्हा दाखल आहे. शिक्रापूर ते चाकण रस्त्यावर कडाचीवाडी गावच्या हद्दीत 1 सप्टेंबर रोजी ही घटना घडली. गाडीच्या चालकाने याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे. चालकाला मारहाण केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी विशाल याला अटक केली आहे. त्याने न्यायालयीन कोठडीत असताना ऍड. श्रीकृष्ण घुगे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला. पुराव्यमध्ये ढवळाढवळ न करणे, साक्षीदारांवर दबाब न आणण्याच्या अटीवर न्यायालयाने हा निकाल दिला.