मुंबई – करोनाबाधितांच्या उपचारामधील महत्त्वाचा घटक असलेल्या रेमडिसिव्हर या इंजेक्शनच्या किंनतीवरुन सातत्याने गदारोळ सुरु असताना आता खासगी रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या रुग्णांनाही दिलासा मिळाला आहे. खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांना रेमडिसिव्हर इंजेक्शन वाजवी किंमतीत मिळावे, यासाठी शासनाने त्याचे दर निश्चित केले आहेत.
आता 2360 रुपयांना हे इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक औषध केंद्र निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णांना वेळेवर आणि वाजवी किंमतीत रेमडेसिव्हीर इंजेक्शन मिळावे, यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांनी दक्षता घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी केले आहे.
राज्यातील शासकीय रुग्णालयात हे औषध मोफत उपलब्ध आहे. परंतु खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना हे औषध मिळत नसल्याच्या अथवा महाग मिळत असल्याच्या तक्रारी राज्यात मोठ्या प्रमाणावर येत असून त्याची दखल घेऊन शासनाने हा निर्णय घेतला आहे.
राज्यामध्ये 59 औषध केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. त्यामध्ये अमरावती विभागात 5, कोकण विभागात 10, नागपूर विभागात 6, औरंगाबाद विभागात 11, नाशिक विभागात 9, बृहन्मुंबई विभागात 5 आणि पुणे विभागात 13 औषध विक्रेते निश्चित करण्यात आले आहेत. इंजेक्शनची आवश्यकता असणाऱ्या रुग्णालयाने त्याबाबत प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविणे आवश्यक आहे. त्यासोबत प्रिस्क्रिप्शन, रुग्णाचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट, आधार कार्ड किंवा छायाचित्र असलेले परवाना अथवा प्रमाणपत्र तसेच रुग्णाची वैद्यकीय माहिती कळविणे आवश्यक आहे.