- लोणावळा कन्स्ट्रक्शनला काळ्या यादीत टाकण्याची नारीशक्ती संघटनाची मागणी
- करोडो निधी पाण्यात, नगर परिषदेचा अनागोंदी कारभार
- मात्र आमदारांचे शहराच्या विकासकामांकडे दुर्लक्ष
कर्जत : कर्जत नगरपरिषद हद्दीत गुंडगे-भिसेगाव येथील रस्त्याचे काम अतिशय धीम्यागतीने आणि निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचे तक्रार मिलिंद भोईर यांचे म्हणणे आहे. तसेच रस्त्यामध्ये येणारे अनधिकृत घरे, दुकाने तसेच काही कॉम्प्लेक्सचे संरक्षण कठडे हटविण्यात न आल्याने वाकडी वळणाचे रस्ते केल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे. मात्र कर्जतच्या विकासकामाकडे आमदार महेंद्र थोरवे यांचे दुर्लक्ष होत असून, नगरपरिषदेवर अंकुश ठेवला जात नसल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.
कर्जत-भिसेगाव-गुंडगे आणि कचेरी रोड ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक पासून संपूर्ण रस्ता खोदला असून, प्रवाशासाठी अथवा आजूबाजूच्या असलेल्या रहिवाशांसाठी पर्याय रस्ता न ठेवल्याने नागरिकांची ये-जा करण्यासाठी गैरसोय होत आहे. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि आमदार यांना वारंवार कळवून ते याकडे कानाडोळा करीत असल्याचे दिसून येत आहे.
तसेच लोणावळा कन्स्ट्रक्शन काम हे निकृष्ट दर्जाचे काम करीत असल्याचे माहित असूनही नगरपरिषदेने कोणत्या अनुषंगाने संपूर्ण शहराची कामे दिली आहे, असा प्रश्न नागरिकांना सतावत आहे. तसेच रस्त्याचे काम व्यवस्थित सुरू आहे की नाही याची पाहणी करण्यासाठी स्थानिक नगरसेवक तसेच मुख्याधिकारी अभियंता एकदाही पाहणीसाठी आले नाही. या संदर्भात मिलिंद भोईर यांनी लेखी तक्रार करूनही अद्यापर्यंत त्या रस्त्याची चौकशी व पाहणी देखील झाली नाही.
श्रद्धा हॉटेल ते भिसेगावपर्यंत रस्ता तयार करणे 4 कोटी 75 लाख 43 हजार 902 रूपये, अभिनव ज्ञान मंदिर शाळेसमोरील मुख्य रस्ता व गटार तयार 4 कोटी 70 लाख 74 हजार 223 रुपये करणे व म्हाडा कॉलनी अंतर्गत रस्ते तयार करणे नानामास्तर नगर येथील अंतर्गत रस्ता व गटार बांधकाम करणे 4 कोटी 67 लाख 18 हजार 254 रुपये, मयुरा हॉटेल ते छत्रपती शिवाजी चौक (खाटीक गल्ली) रस्ता व गटार 2 कोटी 68 लाख 83 हजार 445 रुपये बांधकाम करणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते कचेरी खालील रोड व गटार 4 कोटी 60 लाख 58 हजार 228 रुपये तयार करणे, श्रध्दा हॉटेल ते कर्जत चौक चारपदरी रस्त्यापर्यंत रस्ता तयार 4 कोटी 91 लाख 77 हजार 532 रुपये करणे मौजे गुंडगे येथील कांगणे यांचे घरासमोरील मुख्य रस्ता 4 कोटी 70 लाख 65 हजार 322 रुपये गटार बांधकाम करण्यासाठी खर्च केला जाणार आहे. मात्र आता सध्या कामाचा दर्जा पाहता तर जनतेचा पैसा सर्व विनाकारण वाया घालवीत आहे.
काही ठिकाणी 15 मीटर तर काही ठिकाणी 13 मीटर रस्ता केला आहे. तसेच रस्त्याचे खोदकाम करताना पाण्याचे पाईप लाईन कसेही कुठेही टाकल्याने ठेकेदाराला अंदाज येत नसल्याने खोदकाम करताना पाईप फुटली जाते आणि लाखो लीटर पाणी वाया जाते. त्यामुुळे पाणीपुरवठा खंडित होऊन नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्याचप्रमाणे नगरपरिषद ठेकेदाराला सविस्तर माहिती देत नसल्याचे उत्पादन व्यवस्थापक राकेश देशमुख यांचे म्हणणे आहे. त्यामुळे लोणावळा कन्स्ट्रक्शनला काळ्या यादीत टाकून त्यांचे बिल देण्यात येऊ नये, अशी मागणी नारीशक्ती संघटना करीत आहे.
नगरपरिषदेमध्ये वारंवार तक्रार करूनही मुख्याधिकारी, प्रशासन विभाग तसेच लोकप्रतिनिधी याकडे का लक्ष देत नाहीत, तसेच अतिक्रमण करणाऱ्यांना पाठीशी घातले जात आहेत. नगरसेवक एकदाही पाहणी करण्यासाठी आले नाही.
– मिलिंद भोईर, तक्रारदार, भिसेगाव-गुंडगे.