“ही’ ई- कॉमर्स कंपनीही देणार मराठीची सुविधा

ऍमेझॉनपाठोपाठ फ्लिपकार्टही नमले

मुंबई – मराठी भाषा आणि तिचा सर्वाधिक चांगल्या पद्धतीने वापर याचा विचार केल्यास ज्या पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेना आग्रही आणि आक्रमक रहात आहे, त्याचा प्रत्यय मराठी भाषकांना येत असून, आता ऍमेझॉनपाठोपाठ फ्लिपकार्ट कंपनीनेही आपल्या शॉपिंग ऍपवर मराठी भाषा उपलबध करुन देण्याचे नक्की केले आहे.

भारतातील दिग्गज ई-कॉमर्स कंपनी ऍमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या ऍपमध्ये मराठी भाषेचा समावेश करण्यासाठी मनसेने आक्रमक पवित्रा घेतला होता. यानंतर स्वत: ऍमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोज यांनी मनसेच्या ई-मेलची दखल घेत ऍमेझॉनच्या ऍपमध्ये मराठी भाषेचा समावेश करण्यास मान्यता दिली आहे. यानंतर आता फ्लिपकार्टनेही आपल्या ऍपमध्ये मराठी भाषेचा समावेश करण्याची तयारी सुरु केली आहे.

ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग ऍपमध्ये मराठी भाषेचा समावेश करावा, या मागणीसाठी मनसेने 15 ऑक्‍टोबरला संबंधित कंपन्यांच्या मुंबईतील ऑफिसला धडक दिली होती. ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांच्या बीकेसीमधील ऑफिसमध्ये जाऊन मनसेने आंदोलनाचा इशारा दिला होता. मनसेच्या खळ्ळ खट्याकच्या इशाऱ्यानंतर ऍमेझॉन यूएसएचे प्रतिनिधी आणि मनसे चिटणीस अखिल चित्रे यांच्यात बीकेसी कार्यालयात एक व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक झाली. त्यानंतर ऍमेझॉन मराठी भाषेचा समावेश करण्यासाठी तयार झाली.

ज्याप्रमाणे मनसेने हे आंदोलन केले, त्याचाच पुढचा भाग म्हणून मनसेने इंडियन प्रिमियर लीग अर्थात आयपीएलचे टीव्हीवरील धावते समालोचनही मराठी भाषेत सुरु करण्याची मागणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.