अहमदाबाद – कोव्हिड19 च्या प्रसारामुळे सर्वत्र आजही अनेकांना घरातून काम करावे लागत आहे. अनलॉक6 ची प्रक्रिया केंद्र सरकारने सुरु केली असली, तरी आजही अनेक कार्यालये, उद्योगांमध्हून कर्मचाऱ्यांना घरातूनच काम करावे लागत आहे. त्यामुळे युवा पिढी विशेषत: निराशेने ग्रस्त असल्याचे दिसून येत आहे.
अहबदाबादमध्येही अशीच एक हृदयद्रावक घटना घडली आहे. “वर्क फ्रॉम होम’च्या त्रासाला कंटाळून एका 32 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअर असणाऱ्या या व्यक्तीने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. गेल्या कित्येक दिवसांपासून घरातून काम करताना होणारा त्रास सहन न झाल्याने त्याने आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. शवविच्छेदन अहलावात गळफास घेतल्याने जिगरचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
जिगर गांधी असं आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचं नाव असून तो नोएडा येथील एका कंपनीत गेल्या तीन वर्षांपासून काम करत होता. दोन महिन्यांपूर्वी तो घरी परतला होता आणि घरुनच काम करत होता. जिगरच्या कुटुंबियांनी पोलिसांना तो गेल्या काही दिवसांपासून घरून काम करावं लागत असल्याने, किती तणाव असतो याबद्दल सांगत होता, अशी माहिती दिली आहे. जिगरचा डिसेंबर महिन्यात साखरपुडा होणार होता.
पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना पानीपतमध्ये घडली होती. नोकरी गेल्याने एका दाम्पत्याने आत्महत्या केल्याची भयंकर घटना समोर आली होती. धक्कादायक बाब म्हणजे एका महिन्यापूर्वीच त्यांचं लग्न झालं होतं. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती.