- छोटा राजन टोळीचाही सहभाग; नायजेरियन गुन्हेगारालाही अटक
- गुन्ह्याची मोठी व्याप्ती, सहा पथकांकडून तपास
पिंपरी – पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 7 ऑक्टोबर रोजी चाकण येथून 20 कोटी रुपयांचे 20 किलो “मेफेड्रोन’ (एमडी) हे अंमली पदार्थ जप्त केले होते. या गुन्ह्याचा तपास करीत असताना आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. रांजणगाव येथील औषध निर्मितीच्या बंद पडलेल्या कंपनीत “मेफेड्रोन’ तयार केले आहे. या ठिकाणी आत्तापर्यंत 132 किलो ‘मेफेड्रोन’ तयार करण्यात आले आहे. तसेच, या रॅकेटमध्ये नायजेरियन गुन्हेगारासह छोटा राजन टोळीचाही सहभाग असल्याचे उघड झाले आहे. अवघ्या साठ हजार रुपयांमध्ये बनविल्या जाणाऱ्या एक किलो “मेफेड्रोन’ची किंमत पुढे प्रति किलो दोन कोटींपर्यंत पोहचते. पोलिसांनी आतापर्यंत आरोपींकडून 85 लाख रुपयांची रोकड हस्तगत केली.
तुषार सुर्यकांत काळे (रा. बोरीवली), राकेश श्रीकांत खानिवडेकर उर्फ रॉकी (रा. वसई), किरण राजगुरू, अशोक संकपाळ, किरण काळे यांच्यासह झुबी इफनेयी उडोको या नायजेरियन आरोपीसही अटक करण्यात आली आहे.
या गुन्ह्यात चेतन फक्कड दंडवते (वय 28, रा. मलठण-आंब्रेवस्ती, ता. शिरुर) आनंदगीर मधुगिर गोसावी (वय 25, रा. जि. जळगाव. सध्या रा. अकोले, शिरुर), अक्षय शिवाजी काळे (वय 25, रा. पाचर्णे मळा, ता. शिरुर), संजीवकुमार बन्सी राऊत (वय 44, रा.झारखंड, सध्या रा. उत्तरप्रदेश), तौसिफ हसन मोहम्मद तस्लीम (वय 31, रा. मुजफ्फरनगर. सध्या रा. नोएडा) यांना यापूर्वी अटक करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण येथे पकडलेल्या मेफेड्रोन प्रकरणाची व्याप्ती पाहता त्यांनी या तपासासाठी सहा वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. यातील एका पथकाने आरोपी किरण राजगुरू, अशोक संकपाळ आणि किरण काळे यांना अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या अधिक तपासात गुन्ह्याचे मुख्य सूत्रधार तुषार काळे आणि राकेश खानिवडेकर असून त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी रांजणगाव येथील संयोग बायोटेक प्रायवेट लिमिटेड या कंपनीत मेफेड्रोन बनवल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी रांजणगाव येथे छापा मारून मेफेड्रोन बनवण्याच्या मशिनरीसह कंपनी सील केली.
ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त राजाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, गुन्हे शाखा युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहायक निरीक्षक राम गोमारे, अंबरीश देशमुख, प्रशांत महाले, उपनिरीक्षक चामले, काळूराम लांडगे यांच्या पथकाने केली.
आरोपी झुबी यांची नौटंकी
या गुन्ह्यात अटक केलेला आरोपी झुबी इफनेयी उडोको हा नायजेरियन नागरिक सराईत गुन्हेगार आहे. अंमली पदार्थ तस्करीमध्ये त्याचा हातखंडा असून त्याचे मोठे बॉलीवूड कनेक्शन असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. झुबी याला यापूर्वी अंमली पदार्थ तस्करीमध्ये अनेकदा अटक करण्यात आली आहे. तसेच, तो कोल्हापूर कारागृहात दहा वर्ष शिक्षा देखील भोगून आला आहे. पोलीस अंमली पदार्थांबाबत विचारणा करीत असताना आरोपी आपल्याला भाषाच समजत नसल्याचे नाटक करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
132 पैकी 112 किलोची झाली विक्री
आरोपींनी रांजणगाव एमआयडीसीमधील संयोग बायोटेक लिमिटेड या कंपनीत एकूण 132 किलो मेफेड्रोन बनवले होते. यातील 112 किलो मेफेड्रोनची आरोपी तुषार काळे याने झुबीच्या मदतीने बाजारात विक्री केल्याची कबुली दिली आहे. तर, उर्वरित 20 किलो पिंपरी- चिंचवड पोलिसांनी चाकण येथून जप्त केले आहे.
मॅफेड्रॉन बनविण्यासाठी रांजणगावची निवड
आरोपी मेफेड्रोन बनवण्यासाठी जागा शोधत असताना त्यांची ओळख किरण काळे याच्याशी झाली. तो रांजणगाव एमआयडीसी येथील एका कंपनीत संचालक पदावर काम करत होता. त्याच्या ओळखीने संयोग बायोटेक ही बंद पडलेली कंपनी मिळाल्याने आरोपींनी रांजणगावची निवड केली.
आरोपींना तुरूंगातून मिळाले प्रशिक्षण
आरोपी तुषार काळे आणि राकेश खानिवडेकर हे गुन्ह्याचे मास्टरमाईंड असून त्यांनी अन्य आरोपींना मेफेड्रोन बनवण्याची किलोमागे 60 हजार इतका दर ठरवून दिला होता. मेफेड्रॉन बनविण्याचे प्रशिक्षण आरोपींना तुरुंगातून मिळाल्याचेही तपासात पुढे आले. तुषार काळे याने मेफेड्रोन बनवण्यासाठी आत्तापर्यंत 67 लाख रुपये दिल्याचे समोर आले आहे. तुषार काळे याने पालघर जिल्ह्यातील पालसाईमध्ये 75 लाखांची दोन एकर जमीन विकत घेतली. या जागेवर त्याने एका कारखाना उभारण्याची तयारी सुरू केली होती.
काळेचे छोटा राजन टोळीशी थेट संबंध
आरोपी तुषार सुर्यकांत काळे हा सराईत गुन्हेगार असून त्याचे छोटा राजन टोळीशी थेट संबंध आहेत. त्याच्यावर खून, खंडणी, जबरी चोरी, हत्यार बाळगणे असे एकूण आठ गुन्हे दाखल असल्याचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.