भोपाळ –मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते कमल नाथ यांनी त्या राज्याच्या मंत्री इमरती देवी यांचा उल्लेख आयटम म्हणून केल्याने राजकीय वादंग निर्माण झाले आहे. त्यातून नाथ यांचा निषेध करण्यासाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, खासदार ज्योतिरादित्य शिंदे आणि इतर भाजप नेत्यांनी धरणे आंदोलनाचा भाग म्हणून मौन व्रत केले.
मध्यप्रदेशात सध्या विधानसभा पोटनिवडणुकांमुळे सत्तारूढ भाजप आणि प्रमुख विरोधी पक्ष कॉंग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अशातच रविवारी झालेल्या सभेत बोलताना नाथ यांनी भाजपने उमेदवारी दिलेल्या मंत्री इमरती देवी यांच्याविषयी वाद निर्माण करणारी टिप्पणी केली.
कॉंग्रेसचे उमेदवार साधे व्यक्ती आहेत. ते प्रतिस्पर्ध्याप्रमाणे आयटम नाहीत, असे नाथ यांनी म्हटले. त्यावरून चौहान यांच्यासह भाजप नेत्यांनी नाथ आणि कॉंग्रेसने महिलांचा अनादर केल्याचे टीकास्त्र सोडले. राष्ट्रीय महिला आयोगानेही नाथ यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याची दखल घेऊन त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले. त्याशिवाय, नाथ यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस निवडणूक आयोगाला केली.
ज्योतिरादित्य यांच्यासह त्यांचे समर्थक असणाऱ्या 22 आमदारांनी काही महिन्यांपूर्वी कॉंग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने कॉंग्रेसला मध्यप्रदेशची सत्ता गमवावी लागली आणि सरकार स्थापनेचा भाजपचा मार्ग मोकळा झाला. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांत इमरती देवी यांचाही समावेश आहे.
आमदारांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागांसाठी सध्या पोटनिवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे. त्या पोटनिवडणुकांसाठी 3 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.