पुणे – पुणे विमानतळावर दाखल होणाऱ्या प्रवाशांना 14 दिवस “होम क्वारंटाइन’ होणे बंधनकारक होते. मात्र, याबाबतचे निर्बंध हटविण्यात आले आहेत.
करोनाच्या पार्श्वभूमीवर विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी 14 दिवसांसाठी “होम क्वारंटाइन’ होणे बंधनकारक होते. यासाठी प्रवाशांच्या हातावर “होम क्वारंटाइन’चे शिक्के मारण्यात येत होते. मात्र, आगामी काळात प्रवाशांच्या हातावर शिक्के मारण्यात येणार नसून, “क्वारंटाइन’ होण्याचे नियम देखील शिथिल करण्यात आले आहे.
केंद्र आणि राज्य सरकारच्या सूचनांनुसार हे बदल करण्यात आल्याचे विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात आले. विमानतळावर ये-जा करणाऱ्या प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात येत असून, येत्या काळात देखील स्कॅनिंग करण्यात येणार आहे.
प्रशासकीय सूचनांनुसार होम क्वारंटाइन रद्द केल्याची माहिती विमानतळ प्रशासनाकडून ट्विटरवर देखील देण्यात आली. याशिवाय मास्कचा वापर करणे, सॅनिटायझर वापरणे, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.