शहरातील 8500 पैकी 4000 हॉटेल खुली होण्याची शक्यता
पुणे – राज्य सरकारने राज्यातील हॉटेल्स, रेस्टोरंट-बार खुले करण्यास परवानगी दिल्यानंतर सोमवारपासून (दि.5) शहरातील हॉटेल सुरू होत आहेत. वेगवेगळ्या मानसिकतेतून साडेआठ हजार हॉटेलांपैकी 4 हजार हॉटेलच सुरू होत असल्याचे पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी सांगितले.
शहरातील डाइन इन सेवा गेल्या सहा महिन्यांपासून बंद होती. सुमारे दोन-अडीच महिन्यांपासून पार्सल व होम डिलिव्हरी यावरच हॉटेलचा धंदा सुरू आहे; परंतु केवळ 10 ते 15 टक्के ग्राहकच या सुविधेचा लाभ घेत असल्याने तोटाच अधिक होत आहे.
डाइन इन सेवेस परवानगी द्यावी, अशी मागणी व्यावसायिकांकडून करण्यात आली. ही मागणी मान्य झाली तरी अनेक हॉटेल्स अजूनही सुरू करण्याच्या मानसिकतेत नाहीत. शहरातील सुमारे एक हजार हॉटेल्स कायमस्वरूपी बंद होणार असल्याचा अंदाज आहे. दरम्यान, शहरातील हॉटेल इंडस्ट्री पूर्वपदावर येण्याकरिता मार्च 2021 उजाडेल, असे मत विविध तज्ज्ञांनी व्यक्त केले.
40 हजार कामगारच उपलब्ध…
करोनाच्या प्रादुर्भावापूर्वी शहरातील हॉटेलांमध्ये सुमारे एक लाख कर्मचारी काम करायचे. त्यापैकी 60 हजार कामगार परप्रांतीय किंवा शहराबाहेरील असल्याने ते गावी परतले आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना लगेचच माघारी बोलावणे शक्य नाही. सुमारे 40 हजार कर्मचारी कामावर रुजू होतील, असे सांगण्यात आले.