देशांतर्गत उड्डाणे वाढली; दिल्लीकडे अधिक फेऱ्या
पुणे – करोनाचा फटका विमान वाहतुकीला देखील बसला आहे. मार्च महिन्यापासून विमानसेवा देखील बंद होती. विमानसेवा अनलॉक झाली असताना शुक्रवारी (दि.2) पुणे विमानतळाहून सुमारे 9 हजार नागरिकांनी प्रवास केला. याशिवाय पुणे आणि दिल्ली या मार्गांवर सर्वाधिक विमान फेऱ्या होत असून देशांतर्गत उड्डाणांत पुणे व्यस्त विमानतळ झाले आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर विमानसेवा बंद होती. लॉकडाऊननंतर साधारण 25 मे पासून प्रवासी विमानसेवा पूर्ववत होण्यास सुरूवात झाली. पहिल्या टप्प्यात देशाच्या काही भागांतून ठराविक शहरांतर्गत विमानप्रवासाची परवानगी होती. पुणे विमानतळाहून दिल्ली, अहमदाबाद, जयपूर, कोची, बंगळुरू आदी शहरांत विमानांची ये-जा सुरू होती. सध्या, दररोज सुमारे 30 पेक्षा अधिक विमाने ये-जा करीत आहेत.
मास्क, फेसशिल्डसह नागरिकांना विमान प्रवासास परवानगी देण्यात आली आहे. अनलॉकनंतर नोकरी, व्यवसाय सुरू झाल्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करणाऱ्या नागरिकांचे प्रमाण वाढले आहे.
मागील काही दिवसांमध्ये पुणे-दिल्ली-पुणे हा मार्ग सर्वाधिक व्यस्त आहे. तर 2 ऑक्टोबरला एकूण 9 हजार 647 जणांनी विमानप्रवास केला आहे. त्यापैकी 4 हजार 936 प्रवासी पुण्यात दाखल झाले असल्याचे विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात आले.