पुणे – पोलीस कर्मचाऱ्यांतील फ्री-स्टाइल मारामारीसह विविध कारणांमुळे मागील काही दिवसांपासून पुणे पोलीस मुख्यालय चांगलेच चर्चेत असताना, आता हजेरीवेळी 34 पोलीस कर्मचारी न सांगताच गैरहजर राहिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराची वरिष्ठांनी गांभिर्याने दखल घेतली असून, संबंधित सर्व कर्मचाऱ्यांना ‘सक्त ताकिद’ची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
गेल्या आठवड्यात शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालय परिसरात दोन मारामारीच्या घटना घडल्या. याबाबत काही जणांवर कारवाई करत त्यांची तेथून उचलबांगडी करण्यात आली आहे. तत्कालिन पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी पोलिसांना चांगलीच शिस्त लावली होती. शिस्तभंग केल्यास कारवाईला सामोरे जावे लागते.
पोलीस मुख्यालयात राखीव ठेवण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांपैकी 34 जण हजेरीवेळी अनुपस्थित असल्याचे आढळून आले. यामध्ये महिला व पुरुष कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे.
पोलीस ठाणे आणि मुख्यालयात दररोज सकाळी आणि रात्री ड्युटी बदलत असताना साधारण 9 वाजता हजेरी घेतली जाते. यावेळी सर्वांना हजर राहणे आवश्यक असते. कारण, त्यात काही सूचना किंवा नवीन असे काही सांगितले जाते.