पिंपरी – मंदीचा बसलेला फटका आणि उद्योगांसमोर असलेल्या विविध अडचणींमुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा पुणे जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचे, सूक्ष्म आणि लघु उद्योग सुरू होण्याचे प्रमाण निम्म्याने घटल्याची भीषण बाब आकडेवारीवरून समोर आली आहे.
उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील उद्योगांचा त्यामध्ये समावेश आहे. वाहन उद्योगात दोन वर्षांपासून असलेली मंदीची लाट आणि जुने उद्योगही बंद पडत असल्याने नवीन उद्योग सुरू करण्याची मानसिकता कमी होत असल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.
पुणे जिल्ह्यातील एकूण 2 लाख 34 हजार 290 उद्योगांची जिल्हा उद्योग केंद्राकडे नोंद झालेली आहे. 2018-19 मध्ये मध्यम, सूक्ष्म आणि लघु उद्योग असे एकूण 81 हजार 476 उद्योग सुरू झाले. तुलनेत 2019-20 या आर्थिक वर्षात केवळ 38 हजार 50 मध्यम, सूक्ष्म आणि लघुउद्योग सुरू झाले.
म्हणजे तुलनात्मकदृष्ट्या नवीन उद्योग सुरू होण्याचे प्रमाण निम्म्याने घटले आहे. उत्पादन निर्मिती आणि सेवा उद्योगांचा त्यामध्ये समावेश आहे. जिल्हा उद्योग केंद्राकडे पुणे जिल्ह्यातील 832 मोठ्या उद्योगांची नोंद आहे.
मंदीची लाट कारणीभूत
वाहन उद्योगामध्ये गेल्या दोन वर्षांपासून मंदीची लाट आहे. सध्या करोनामुळे निर्माण झालेल्या संकटाने नवीन उद्योग सुरू करण्याची “रिस्क’ घेण्याचे प्रमाण कमी झाले आहे. उद्योग सुरू केला तर त्यातून आपल्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम होता आले पाहिजे, अशी नवउद्योजकांची भावना असते. मात्र, ती खात्री मिळत नसल्याने नवीन उद्योग सुरू करण्यासाठी पुढे येणाऱ्यांचे प्रमाण घटले आहे. त्याशिवाय, उद्योगामध्ये स्थिरस्थावर असलेले उद्योजक देखील आणखी गुंतवणूक वाढविण्यास तयार नाही. 25-30 वर्ष उद्योग करणाऱ्या काही लघुउद्योजकांनी करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने उद्योग बंद करण्याचा पर्याय निवडला आहे.
उद्योग उभारणीसाठी बॅंकांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते फेडता फेडता उद्योजकांच्या नाकीनऊ आले आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी दिली.
जिल्हा उद्योग केंद्राकडे 2018-19 मध्ये 81 हजार 476 मध्यम, सूक्ष्म व लघुउद्योगांची नोंद झाली. तर, 2019-20 मध्ये 38 हजार 50 उद्योग नोंदविले गेले. 2019 मध्ये झालेल्या निवडणुका व अन्य विविध कारणांमुळे नवीन उद्योग नोंदविण्याचे प्रमाण घटले आहे.
– सदाशिव सुरवसे, उद्योग सहसंचालक, पुणे विभाग.