टोकियो – जपानमधील सत्तारुढ लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेतेपदी योशिहिदे सुगा यांची आज निवड करण्यात आली आहे. त्या देशाचे भावी पंतप्रधान म्हणून त्यांचीच निवड होणे आता जवळ जवळ निश्चित मानले जात आहे.
माजी पंतप्रधान शिंझो आबे यांचे वारसदार म्हणून लिबरल डेमोकॅटिक पार्टीच्या नेतेपदी निवड होण्यासाठी झालेल्या निवडणूकीत सुगा यांना 377 मते मिळाली. तर पक्षनेतेपदाच्या शर्यतीतील अन्य दोन उमेदवारांना मिळून 157 मते मिळाली. आबे यांनी गेल्याच महिन्यात प्रकृती अस्वास्थतेच्या कारणास्तव आपल्या राजीनाम्याची घोषणा केली होती.
त्यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर भावी पंतप्रधान निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. त्यात प्रथमपासूनच सुगा यांच्या नावाचीच अधिक चर्चा होती. सुगा हे सध्या आबे यांच्या सरकारमधील मुख्य कॅबिनेट सचिव म्हणून कार्यरत आहेत. लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाच्या सत्तारुढ आघाडीच्या बहुमतमुळेच बुधवारी होणाऱ्या पंतप्रधानपदाच्या निवडणूकीमध्ये त्यांच्या नावाची निश्चिती मानली जाऊ लागली होती.
सुगा यांनी स्वतःला सुधारणावादी आणि सीमांचे बंधन तोडून धोरणांची अंमलबजावणी करणारा कार्यकर्ता संबोधले आहे. विदेशी पर्यटन उद्योगाला त्यांनी विशेष मदत केली आहे. तसेच सेलफोनचे बिल कमी करण्यात आणि कृषी मालाच्या निर्यातीलाही त्यांनी चालना दिली आहे.