पुणे – दहावी आणि बारावीनंतरच्या पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमाला प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्यास पुन्हा मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता पॉलिटेक्निक अभ्यासक्रम व डिप्लोमा प्रवेशासाठी 21 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.
तंत्रशिक्षण संचालनालयाकडून (डीटीई) दहावीनंतरच्या पॉलिटेक्निक आणि बारावीनंतरच्या फार्मसी, सरफेस कोटींग टेक्नॉलॉजी, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी अशा डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया 1 ऑगस्टपासून राबविण्यात येत आहे.
करोनामुळे उद्भवलेल्या एकूण परिस्थितीचा विचार करून डीटीईने प्रवेश अर्ज करण्याची मुदत वाढवून द्यावी; तसेच राखीव प्रवर्गातून प्रवेश घेण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना कागदपत्रे व दाखले जमा करण्यासाठी कालावधी वाढवून देण्याची मागणी पालकांकडून करण्यात आली होती. यावर डीटीईने अर्ज सादर करण्याची मुदत तिसऱ्यांदा वाढविली आहे.
दरम्यान, प्रवेशाची तात्पुरती गुणवत्ता यादी 24 सप्टेंबर रोजी जाहीर होणार असून, त्याबाबत आक्षेप नोंदवण्यासाठी 25 ते 27 सप्टेंबर अशी मुदत दिली आहे. त्यानंतर 29 सप्टेंबर रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे, अशी माहिती डीटीईचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी दिली.