पुणे – तंत्रशिक्षण संचालनालय अंतर्गत प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या दोन फेरीनंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश देण्यासाठी संस्थास्तराव प्रवेशफेरीचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी संबंधित संस्थेत जाऊन प्रवेश घ्यावा, असे आवाहन पुणे विभागीय तंत्रशिक्षण विभागाने केले आहे.
पुणे विभागात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांतील शासकीय व अनुदानित तंत्रनिकेतनामध्ये पदविका अभ्यासक्रमामध्ये दोन फेरीनंतर प्रवेशाच्या जागा रिक्त राहिल्या आहेत. या रिक्त जागांवर दहावी पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्याची मागणी पालकांतून होत होती. त्यानंतर आता तंत्रशिक्षण विभागाने रिक्त जागांवर प्रवेश देण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्याची चिन्हे आहेत.
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या शासकीय तंत्रनिकेतनांमध्ये प्रवेशाची संधी उपलब्ध करून देता येण्यासाठी संस्थास्तराव प्रवेश फेरीचे वेळापत्रक जिल्हानिहाय प्रसिद्ध केले आहे. त्याचे परिपत्रक तंत्रशिक्षणच्या पुणे विभागाने जारी केले. त्यानुसार प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी संबंधित संस्थेमध्ये प्रवेशासाठी आवश्यक मूळ कागदपत्र, प्रवेशासाठीचे शुल्कासह सकाळी दहा वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन सहसंचालक डॉ. डी. व्ही. जाधव यांनी केले आहे.
पुण्यातील प्रवेशफेरीचे वेळापत्रक
1. शासकीय तंत्रनिकेतन : 5 जानेवारी
2. कुसरो वाडिया संस्था : 6 जानेवारी
3. शासकीय तंत्रनिकेतन, अवसरी खुर्द : 7 जानेवारी
4. महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ प्रिटिंग टेक्नॉलॉजी : 5 जानेवारी
5. महाराष्ट्र राज्य इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट : 5 जानेवारी
ऍण्ड केटरिंग टेक्नालॉजी (ट्रव्हल व टुरिझम अभ्यासक्रम)