तंत्रशिक्षण संचालनालयाचे निर्देश
पुणे – राज्यातील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्यार्थ्यांकडून घेतलेली अनामत रक्कम महाविद्यालयांकडेच कोट्यवधी रुपये जमा असल्याचे उघड झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांकडे जमा असलेली अनामत रक्कम, किती विद्यार्थ्यांनी ही रक्कम घेतली, शिल्लक अनामत रक्कम याचा सर्व लेखाजोखा सादर करण्याचे निर्देश तंत्रशिक्षण संचालनालयाने सर्व महाविद्यालयांना दिले आहेत. त्यामुळे आता महाविद्यालयांकडे पडून असलेल्या विद्यार्थ्यांच्या अनामत रकमेचा तपशील समोर येण्याची चिन्हे आहेत.
पदवी व पदव्युत्तरच्या प्रथम वर्षास प्रवेश घेत असताना विद्यार्थ्यांकडून अनामत रक्कम, ग्रंथालय व प्रयोगशाळा अनामत रक्कम घेतली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ही रक्कम विद्यार्थ्यांनी घेऊन जाणे अपेक्षित आहे. मात्र, बहुतांश विद्यार्थी ही रक्कम घेण्यास महाविद्यालयाकडे येत नाहीत. काही ठिकाणी ही रक्कम देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे विद्यार्थी संघटनांचे म्हणणे आहे.
यासंदर्भात दै. “प्रभात’ने पुण्यातील शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयाकडे 14 लाख 28 हजार 430 रुपये इतकी अनामत रक्कम पडून असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर राज्यातील अनेक महाविद्यालयांकडे ही रक्कम पडून असल्याची बाब निदर्शनास आली.
दरम्यान, पुण्यातील अमर एकाड यांनी माहिती अधिकारातून उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे अनामत रक्कमेची माहिती मागविली. त्यानंतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या संस्थांना अनामत रक्कमेची माहिती सादर करण्याचे आदेश तंत्रशिक्षण सहसंचालक प्रमोद नाईक यांनी दिले. महाविद्यालयाचे नाव आणि 2010 ते 2020 पर्यंत एकूण जमा झालेली अनामत रक्कम, विद्यार्थ्यांना परत केलेली अनामत रक्कम आणि एकूण शिल्लक अनामत रक्कम तपशील सादर करावे लागेल. तसेच, शिल्लक अनामत रकमेतून महाविद्यालये केलेला खर्च आणि त्यासाठी सहसंचालक कार्यालयाची परवानगी घेतली असल्याची प्रतही सादर करणे महाविद्यालयांना बंधनकारक आहे. त्यामुळे शिल्लक अनामत रक्कम असलेल्या महाविद्यालयांची धाबे दणाणले आहेत.
पुण्यातील दोन महाविद्यालयांचा समावेश
पुण्यातील शिवाजीनगर येथील मॉडर्न कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि फर्गसन महाविद्यालयाकडे अनामत रक्कम पडून असल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट झाले आहे. मॉडर्न महाविद्यालयाकडे 14 लाख, तर फर्गसन महाविद्यालयाकडे 11 लाख 73 हजार 100 रुपये अनामत रक्कम पडून असल्याची बाब पुढे आली आहे. मुंबई, पुणे, चंद्रपूर, सिंधुदुर्ग, रायगड येथील दहा प्रतिष्ठित महाविद्यालयांकडे 3 कोटींहून अधिक अनामत रक्क्म पडून असल्याचे माहिती अमर एकाड यांनी दिली.