आमीर खान आणि जॅकी श्रॉफबरोबरच्या “रंगीला’ला 25 वर्षे पूर्ण झाल्याची आठवण उर्मिला मातोंडकरने शेअर केली आहे. तिने सोशल मीडियावर या सिनेमाच्या आठवणी शेअर केल्या आहेत. विशेषतः एका स्वप्नाळू मुलीला प्रोत्साहन देणाऱ्या फिल्म इंडस्ट्रीतील लोकांच्या पाठिंब्याबद्दल तिने सर्वांना धन्यवादही दिले आहेत.
“चल मेरे संग संग, ले ले दुनिया के रंग, हो जा रंगीला…’ हे सुपरहिट गाण्याचे बोलही उर्मिलाने शेअर केले आहेत. या सिनेमाने जेवढी हवा केली होती, ते अजूनही पब्लिकच्या स्मरणात असेल. आमिरची हटके ऍक्टिंग आणि उर्मिलाचा अनोखा अंदाज एकदम फिट होता. या सिनेमातील एक क्लोज्ड लुकही उर्मिलाने शेअर केला आहे. एक स्पोर्टस हॅट घातलेली आणि कुरळे केस मोकळे सोडलेली मिली, म्हणजेच उर्मिला सगळ्यांना नक्की आठवत असेल.
हा रोल दुसऱ्या कोणाचाही नसून आपल्या सारख्या सर्वसामान्य कुटुंबातील एका सामान्य मुलीचा आहे. लहानपणापासून बघितलेले सिने ऍक्टर होण्याचे स्वप्न अनेकांच्या पाठिंब्यानेच पूर्ण झाले आहे. त्या सर्वांना मनापासून धन्यवाद, असेही उर्मिलाने म्हटले आहे. राम गोपाल वर्माच्या “रंगीला’ला ए.आर. रेहमानचे संगीत होते. त्यातील गाणी आणि आमीरचा डान्स खूप हिट झाली होती.