न्यूयॉर्क – जपानची मानांकित टेनिसपटू नाओमी ओसाका हिने दुखापतीतून सावरताना अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तिने उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात ऍनेट कोंतावेटवर 6-3, 6-4 अशी सरळ दोन सेटमध्ये मात केली.
ओसाकाला डाव्या पायाचे स्नायू दुखावल्याने जानेवारी व फेब्रुवारीतील अनेक स्पर्धांमधून माघार घ्यावी लागली होती. मात्र, गेल्या आठवड्यापासून तिने सराव सुरू केल्यावरही तिला काही वेळा पायाच्या दुखापतीमुळे त्रास होत होता. मात्र, पहिल्या फेरीपासून तिने आपल्यावर दुखापतीमुळे कोणताही परिणाम झाला नसल्याचे सिद्ध करत वर्चस्व राखले. या सामन्यात कोंतावेटविरुद्ध तिने 45 सर्व्हिसमध्ये 35 गुणांची नोंद केली. या दोन्ही खेळाडूंमध्ये आजवर पाच लढती झालेल्या असून प्रत्येकवेळी ओसाकानेच विजय मिळवला आहे.
केवळ 22 वर्षांची असलेल्या ओसाकाने अफलातून रिटर्न मारण्यात आपण सर्वात यशस्वी असल्याचे याही स्पर्धेत सिद्ध केले. उपांत्यपूर्व फेरीत तिचा सामना बिगर मानांकित शेल्बी रॉजर्सशी होणार आहे. रॉजर्सने ओसाकाविरुद्ध झालेल्या यापूर्वीच्या तीनही लढती जिंकलेल्या आहेत.